यापुढे काळजी घेईन; गुन्हेगारांसोबतच्या ‘त्या’ फोटोवर गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. औरंगाबाद दौऱ्यातील त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनिल देशमुख यांच्यासोबत तीन गुन्हेगार देखील उपस्थित होते. या तिन्ही गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने अनेकांनी या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरून विरोधकांनी देखील अनिल देशमुखांवर निशाणा साधला आहे. या सर्व प्रकारानंतर स्वतः अनिल देशमुख यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

“मी औरंगाबादला गेलो होतो.अनोळखी गाव आहे.तिथे अनेक लोक भेटायला येतात. अशावेळी कोणाची काय प्रवृत्ती आहे, कोण कसे आहे, काय पार्श्वभूमीवर आहे हे माहीत पडत नाही. खूप गर्दी असते. त्यामुळे अशा गोष्टी घडतात. यापुढे त्याची नक्की काळजी घेईन”, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिले आहे. अनिल देशमुख हे औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. यावेळी तिन्ही गुन्हेगारांनी अनिल देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.
कलाम कुरेशी, सय्यद मातीन आणि जफर बिल्डर अशा या तिन्ही गुन्हेगारांची नावे आहेत. यांपैकी कलाम कुरेशी आणि जफर बिल्डर हे एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत. तर, सय्यद मतीनही नगरसेवक पदावर होता. यामधील एक एक गुटखा किंग, तर दुसरा ट्रक चोर आहे तर तिसऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.
नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक

दरम्यान, या व्हायरल फोटोवरून विरोधकांनी गृहमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत गृहमंत्र्यांवर टीका केली आहे. “बलात्कारी व गुन्हेगारांना “शक्ती” देण्याची मोहीमच जणू गृहमंत्र्यांनी उघडलीये. अन्याय अत्याचारग्रस्त महिलांची भेट घेण्यास त्यांचे सात्वंन करण्यास गृहमंत्र्यांना वेळ नाही.पण, गुन्हेगारांना बलात्काऱ्यांना बळ देण्यास मात्र तत्पर ‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक “, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी टीकास्त्र डागले.

Previous articleहिंदूंचा अवमान करणा-या शरजील उस्मानीवर कठोर कारवाई करा!
Next articleसर्वसामान्यांच्या सोयीनुसार लोकलच्या वेळा बदलणार,राजेश टोपेंनी दिले संकेत