मुंबई नगरी टीम
मुंबई : आगामी महापालिका निवडणूक जवळ आलेली असतानाच कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेला मोठे भगदाड पडले आहे. मनसेच्या राजेश कदम यांनी शिवसेनेत, तर मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसेला गळती लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ही गळती रोखणे मनसेसमोर मोठे आव्हान असणार आहे. यासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया देत पक्षातून बाहेर पडलेल्यांना चांगलेच फटकारले आहे. स्वतःवर आणि आपल्या नेत्यावर आत्मविश्वास असायला हवा. स्वतःचा आत्मविश्वास ढळला असेल तर तुम्ही इकडे तिकडे जाणारच, असे नांदगावकर यांनी सुनावले. तसेच राजकारणात अशा गोष्टी घडतच असतात असेही ते म्हणाले.
डोंबिवलीतील मनसेनेचे माजी शहराध्यक्ष तसेच प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी शिवबंधन बांधले. त्यापाठोपाठच मंगळवारी कल्याण-डोंबिवली मनपातील गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मनसेच्या या आऊटगोइंगवर एकच चर्चा सुरू झाली असताना बाळा नांदगावकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “राजकारणात हे असे चालतच असते, त्यात नवीन काय आहे. अशा काही गोष्टी घडतच असतात. मध्यंतरी मागच्या निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादीची किती लोकं सोडून गेली, काँग्रेसची किती लोकं सोडून गेली. भाजपची किती लोकं सोडून गेली, आता एकनाथ खडसे नाही का सोडून गेले. चालूच असते ते, पुढे जे काही होईल ते बघा, त्यावर भाष्य करण्यात काही पॉइंट नाही”, असे बाळा नांदगावकर म्हणाले.
“पुढे जाऊन आपल्याला काय करायचे आहे, त्यावरच प्रत्येक जण निर्णय घेत असतो. आज लगेचच निर्णय घेतो काय? त्यांनी अगोदर कित्येक महिने विचार केलेला असतो आणि नंतर ते निर्णय घेतात. एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचे आहे, याचा निर्णय विचार करूनच घ्यावा लागतो. आता बोलला लगेच गेला असे होत नसते. आपल्याला घर बदलतानाही विचार करावा लागतो ना, तशीच काहीशी आश्वासने त्यांना दिलेली असतील. काही वेळेला स्वतःचा वैयक्तिक स्वार्थसुद्धा असतो. काही वेगळ्या अडचणी असतात. कुठे अडकू नये म्हणून किंवा माझ्या भविष्याचे काय होईल, असेही असते”, असा टोला नांदगावकर यांनी लगावला. प्रत्येकाच्या मनाचा विषय असतो. तुमचा जर स्वतःवर आत्मविश्वास नसेल. “तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास ढळला असेल तर तुम्ही इकडे तिकडे जाणारच. तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजे ना. तसाच तुमच्या नेत्यावरही आत्मविश्वास हवा. माझा नेता खंबीर आहे आणि तो मला पुढे घेऊन जाईल हा आत्मविश्वास तुमच्याकडे नसेल तर उपयोगच नाही”, अशा शब्दांत बाळा नांदगावकर यांनी पक्षातून गेलेल्यांना फटकारले.