लाईट बिल वसूलीवरून राजकीय वातावरण तापले;स्वाभिमानी आणि मनसेचे सरकारला खडेबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई : लॉकडाउन काळातील वाढीव वीज बिलाची थकबाकी वसूल करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत.इतकेच नव्हे तर ग्राहकांनी थकीत वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जाईल, असा थेट इशाराही महावितरणकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वर्षात सामान्यांसाठी हा मोठा झटका आहे. वाढीव बिलाच्या या मुद्द्यावरून आता विरोधकांनी आक्रमक पवित्र घेतल्याचे दिसत आहे. हिंमत असल्यास घरगुती कनेक्शन तोडून दाखवावे,असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. या पाठोपाठ आता मनसेनेही ठाकरे सरकारवर आगपाखड केली आहे.

कोरोना काळात अनेकांना भरमसाठ वाढीव वीज बिले आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. तसेच वीज बिलांत सवलत देण्याची मागणी विरोधकांनी केली होती. त्यासाठी गेल्या काही महिन्यांत आंदोलने देखील करण्यात आली होती. त्यानंतर वीज बिलांमध्ये सवलत देऊ. दिवाळी पर्यंत ग्राहकांना गोड बातमी देऊ, असे आश्वासन ऊर्जा मंत्र्यांकडून देण्यात आले होते. मात्र अद्याप वीज बिलातून दिलासा मिळालेला नाही. उलट वीज बिल थकबाकीची वसुली करण्याचे आदेश महावितरणने दिले असून यावर विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकराचा हा निर्णय तुघलकी असल्याची टीका मनसे नेते बाळा नांदगावर यांनी केली आहे. सरकार एकीकडे वीज बिलात सवलत देऊ, १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करू असे म्हणते. मग आता काय झाले? लोकांनी का म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवायचा. सरकार फसवणूक करत असून लोकांना अंधारात ढकलले जात असल्याचा आरोप नांदगावकर यांनी केला.

बीज बिल प्रश्नी मनसे रस्त्यावर उतरली, आंदोलने केली, किती कार्यालये फोडली त्यासाठी आमची लोकं जेलमध्ये गेली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः राज्यपालांकडे निवेदन घेऊन गेले. राज्यपालांनी दिलेल्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील एक पत्र दिले आणि चर्चा केली. मात्र तरी यावर निर्णय झाला नाही, अशी टीका त्यांनी केली. हे सरकार लोकांच्या भल्यासाठी आल्याचे दाखवत आहे. मात्र तसे नसून ते लोकांचे दुश्मन आहेत. त्यामुळे लोकांनी या सरकारला गाढून टाकावे, आणि येणारे सरकार तरी चांगले आणा, असे आवाहन नांदगावकर यांनी केले आहे.

राज्य सरकारशी दोन हात करायला तयार – राजू शेट्टी

कनेक्शन तोडून बीज बिल वसूल करू, असे ऊर्जा मंत्री म्हणत असतील, तर महाराष्ट्रातील घरगुती वीज ग्राहक हे सहन करणार नाही. हिंमत असेल तर सरकारने वीज बिल तोडण्याचे धाडस करावे. मंत्र्यांनी महाराष्ट्रात दौरे काढावे आणि घरगुती बीज बिल ग्राहकांचे मत काय आहे हे जाणून घ्यावे, असे आव्हान राजू शेट्टी यांनी दिले आहे. आम्ही दोन महिन्यांपासून आंनदोलन करत असून मागे हटणार नाही. ऊर्जा मंत्र्यांना जे काही करायचे ते त्यांनी खुशाल करावे, सरकारशी दोन हात करायला आम्ही तयार आहोत, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

Previous articleबाळासाहेबांच्या आदेशापेक्षा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मोठे वाटते,राणेंचा प्रहार
Next articleतुम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे का ? मग ही बातमी नक्की वाचा