मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली । राज्य आणि देशपातळीवरील राजकीय घडामोडींवर नेहमीच चर्चा होत असतात. त्यातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी हा मोठा चर्चेचा विषय ठरतो. अशाच एका चर्चेने डोके वर काढले आहे. ही चर्चा आहे काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीची. विशेष म्हणजे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर ही भेट झाली असून त्याचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतली आहे. त्यानंतर पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी नाना पटोले हे दिल्लीत गेले होते. पटोले हे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी जात असताना नेमक्या त्याचवेळी उदयनराजे भोसले यांची गाडीही त्याच परिसरातून जात होती. त्यानंतर उदयनराजे यांनी गाडी थांबवत नाना पटोले यांची भेट घेतली. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल उदयनराजेंनी त्यांचे अभिनंदनही केले. मिळालेल्या माहितीनुसार ही भेट तीन दिवसांपूर्वी झाली होती. त्या भेटीचा फोटो आता समोर आला असून सध्या तो चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे निश्चितच या फोटोमुळे नेहमीप्रमाणे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
या भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेला आणखी एक किनार आहे ती म्हणजे नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्याची. काँग्रेसला बळकटी देण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेण्याच्या दिशेने काम सुरू आहे. ‘जस्ट वेट अँण्ड वॉच’…पुढे आश्चर्यकारक धक्के देऊ, असे सूचक विधान नाना पटोले यांनी प्रदेशाध्यपदी नियुक्ती झाल्यानंतर केले होते. अशातच उदयनराजे आणि नाना पटोले यांच्या भेटीचा हा फोटो समोर आल्याने चर्चेला सुरूवात झाली आहे.