राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्दावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला मोठा खुलासा

मुंबई नगरी टीम

नाशिक । विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मुद्दा हा अद्यापही मार्गी लागलेला नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अद्याप राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या १२ नावांवर सहमती दर्शविण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा तिढा नेमका कधी सुटणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांना थेट न्यायालयात जाण्याचाच सूचक इशारा दिला आहे. नाशिकमध्ये ते बोलत होते.

नाशिक विभागाच्या वित्त नियोजनाच्या बैठकीसाठी अजित पवार उपस्थित होते.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी निधी वाटप आणि विकास कामांबाबत माहिती दिली. यावेळी रखडलेल्या राज्यपाल सदस्य नियुक्तीविषयी देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की,महाविकास आघाडीने राज्यपालांना सगळे रितसर कळवले आहे. बहुमत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सर्व निकष पाळत नियमात बसणाऱ्याच १२ लोकांच्या नावांची शिफारस केली आहे. राज्यपाल लवकरच ही नावे जाहीर करतील याकडे आम्हीही लक्ष देऊन आहोत असे अजित पवार म्हणाले. तसेच न्यायालयात जावे लागले अशी वेळ राज्यपाल येऊ देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र अजित पवारांच्या या विधानामुळे त्यांनी राज्यपालांना अप्रत्यक्ष असा सूचक इशाराच दिल्याचे दिसत आहे.

मुंबई लोकलच्या वेळा बदलणार ?

सर्वसामान्यांसाठी सुरू झालेल्या मुंबई लोकलसंदर्भातही अजित पवारांनी भाष्य केले. सर्व समान्यांसाठी लोकलच्या काही वेळा निर्धारित करून दिल्या आहेत. मात्र या वेळांबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजले. परिस्थितीचा अंदाज घेऊनच लोकलच्या वेळेत बदल केला जाईल, असे अजित पवार यांनी संगीतले.

मोदींनी शेतकऱ्यांप्रती भावूकपणा दाखवावा

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा आणि त्यावर तोडगा काढावा, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मार्ग काढण्यासाठी केंद्राने २ पावले मागे यावे, असेही ते म्हणाले. गुलाब नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. तोच भावूकपणा शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला असता तर बरे झाले असते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Previous articleसंजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवयच :चंद्रकांत पाटलांचा टोला
Next article‘जस्ट वेट अँण्ड वॉच’…खा.उदयनराजे भोसले आणि नाना पटोलेंच्या भेटीवर चर्चा