मुंबई नगरी टीम
पुणे । देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात पुतळ्यांवरून रंगलेले राजकारण काही नवीन नाही.जेजुरी गडावर जेजुरी संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी होणार होते.मात्र त्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटेच आपल्या समर्थकांसह गडावर जाऊन मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केले.यावेळी शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी देत पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.दरम्यान,शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण नियोजित केलेले असताना देखील पडळकर यांनी केलेल्या प्रकारामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.
जेजुरी गडावरील अहिल्याबाई यांचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे अनावरण रखडले होते.शनिवारी शरद पवारांच्या हस्ते ते होणार होते. मात्र गोपीचंद पडळकर यांनी पहाटेच मेंढपाळांच्या हस्ते हा अनावरण कार्यक्रम आटोपला. त्यानंतर पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना पवारांवर हल्लाबोल चढवला. आहिल्याबाईंचे काम हे बहुजन समाजाबरोबरच समाज कल्याणासाठी होते. शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण होऊ नये अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती.त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये म्हणून गनिमी काव्याने त्याचे अनावरण केले,असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करणे ही अपमानास्पद बाब आहे.आहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचे काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळेच आम्ही युवा कार्यकर्त्यांच्या सोबत जेजुरीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गडावर आलो असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल
दरम्यान, छुप्या पद्धतीने पुतळ्याचे अनावरण करणे गोपीचंद पडळकर यांना चांगलेच भोवले आहे. कारण जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जेजुरी पालिस ठाण्यात पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे, पोलिसांशी झटपट केल्याप्रकरणी पडळकरांसह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.