मुंबई नगरी टीम
- शिवसेनेत गट वगैरे काही नाहीत
- संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री
- मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत
मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.तसेच त्यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेत दोन गट पडल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेत कधी गट वगैरे नसतात.हा विषय सरकारचा असून याबाबत सरकारी पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.
आज मुंबईत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. “हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोक त्यासंदर्भात त्यांचे मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील.संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत, कार्यकर्ते, आमदार आहेत.अनेक वर्ष शिवसेनेचा चेहरा आहेत. त्याप्रकरणी पोलीस तपासाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यासंबंधीची माहिती मुख्यमंत्री घेतील”, असे संजय राऊत म्हणाले. संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रश्नावर आपल्याला याबद्दल काही माहित नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
संजय राठोड स्वतःहून काही बोलत नाही. शिवाय राज्य सरकारकडूनही यावर भूमिका स्पष्ट केली जात नाही. याविषयी बोलताना यावर मी काही बोलू शकत नाही,असे संजय राऊत म्हणाले. तसेच मुख्यमंत्री हे सरकारमध्ये प्रमुख आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तेव्हा आपण असे कसे म्हणता सरकार भूमिका घेत नाही ? असा उलट सवाल संजय राऊतांनी केला.