जयंत पाटील आपण एक दिवस या महाराष्ट्राचे नेतृत्व करावे याच सदिच्छा !

मुंबई नगरी टीम

  • सत्यजीत तांबे यांच्या हटके शुभेच्छा
  • जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा आज वाढदिवस
  • पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर इतर पक्षातील नेते मंडळींनीही त्यांना सदिच्छा दिल्या आहेत. मात्र यामध्ये जयंत पाटील यांना काँग्रेसकडून आलेल्या एका शुभेच्छाची चर्चा सर्वाधिक रंगलेली पाहायला मिळत आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विटरच्या माध्यमातून जयंत पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “काका वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! एक दिवस आपण या महाराष्ट्राचे नेतृत्व करावे याच सदिच्छा”, असे ट्विट सत्यजीत तांबे यांनी केले आहे. या शुभेच्छा खास ठरल्या आहेत कारण सत्यजीत तांबे यांनी पाटील यांच्या नेमक्या भावनांना हात घातला आहे. काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची आपली सुप्त इच्छा व्यक्त केली होती. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजल्याचे चित्र होते. जयंत पाटलांच्या या इच्छेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पाठींबा दिला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर उत्तर देत आपल्यालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते असे मिश्किलपणे म्हणत चर्चांवर पडदा टाकला.

या सर्व घडामोडींदरम्यान जयंत पाटील यांच्या मनातील मुख्यमंत्री होण्याची इच्छा मात्र समोर आली. हाच धागा पकडत सत्यजीत तांबे यांनी अशा हटके शुभेच्छा दिल्या. मात्र सत्यजीत तांबेंच्या या शुभेच्छा काही नेटकाऱ्यांना पटलेल्या दिसत नाहीत. एका नेटकाऱ्याने म्हटले की, प्रत्येक वेळेस त्यांनी का नेतृत्व करावे ? आपल्या जिल्ह्याला कधी संधी मिळणार? असे पण नाही की आपल्याकडे तसे नेतृत्व नाही… बाळासाहेब थोरात आहेत ना ? का तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहारी जाताय ? असा प्रश्न करण्यात आला आहे. तर दुसऱ्या एकाने ट्विट अजित दादा बघतील असे म्हटले. आणखी एक नेटकरी म्हणतो की, आम्ही मामांना सपोर्ट करतोय पुढचे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरातच असतील, असा विश्वास नेटकाऱ्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान,एकाच पक्षात असलेले मामा आणि भाचा म्हणजे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सत्यजीत तांबे यांचे कौटुंबिक संबंध आहेत. असे असूनही सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्राच्या पुढील नेतृत्वासाठी राष्ट्रवादीतील जयंत पाटील यांना सदिच्छा दिल्या. त्यामुळे काँग्रेसमधील या युवा नेत्याची वाटचाल नेमक्या कोणत्या दिशेने जातेय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Previous articleवनमंत्री संजय राठोडांच्या राजीनाम्यावर संजय राऊत काय म्हणाले ?
Next articleभाजप नेत्यांची डजनभर प्रकरणे; कॅबिनेट मंत्र्यांने दिले आव्हान !