मुंबई नगरी टीम
- परीक्षा होणार नसल्याच्या बातम्या चुकीच्या
- दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणे आम्हाला भाग
- ही बातमी चुकीची आणि दिशाभूल करणारी
मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे आणि राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण देत दहावी बारावीच्या परीक्षा होणार नसल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले.
राज्यातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची शक्यता असल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या होत्या.याबाबत आपण कोणतेही मत व्यक्त केले नसल्याने अशा प्रकारची माहिती पूर्णपणे चुकीची आहे, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.दहावीच्या परीक्षा होणार नसल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगताच,विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणे आम्हाला भाग आहे,असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.एका वृत्त वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी ही माहिती दिली.
दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज अधिकृतपणे जाहीर केले असून,बारावीची २३ एप्रिल ते २१ मे आणि दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे.शिक्षणमंत्र्यांनी आज परीक्षाबाबत खुलासा केल्यानंतर काही वेळातच शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे.दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे, दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज अधिकृतपणे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.