वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी खोटारडेपणाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी

मुंबई नगरी टीम

मुंबई । वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे उभारण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणताही करार झालेला नव्हता आणि कंपनीला त्या प्रकल्पासाठी कोणताही भूखंड दिलेला नव्हता असे स्पष्ट करणारा कागदोपत्री पुरावा उपलब्ध झाला असून याविषयात खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे,अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी तळेगाव येथे वेदांता फॉक्सकॉन विषयावरून केलेले आंदोलन हा खोटारडेपणा होता.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशी खोटारडी आंदोलने बंद करावीत. अन्यथा ते जेथे आंदोलन करतील तेथे जाऊन आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.वेदांता फॉक्सकॉन कंपनीबाबत एमआयडीसीचे पत्र आपल्याकडे आहे. त्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, त्या कंपनीसोबत राज्य सरकारचा सामंजस्य करार झालेला नाही आणि कंपनीस महामंडळाकडून जागेचे वाटप झालेले नाही. अशा स्थितीत हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची तक्रार खोटारडेपणाची आहे. प्रत्यक्षात आघाडी सरकारने कंपनीशी करार केला नाही आणि जमीनही दिलेली नाही, हे आता उघड झालेले आहे. हा प्रकल्प महाविकास आघाडीमुळेच राज्याबाहेर गेल्याचा हा पुरावा आहे. खोटारडेपणाबद्दल आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी बावनकुळे यांनी करून वेदांताच्या विषयावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट करून राज्यातील जनतेची दिशाभूल आहे.या नेत्यांनी जनतेची माफी मागण्यासोबतच ही आंदोलने बंद करावीत अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला.

Previous articleतानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा; विरोधक आक्रमक
Next articleएकनाथ शिंदे यांच्या संदर्भात अशोक चव्हाणांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ