एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात अशोक चव्हाणांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई नगरी टीम

मुंबई । २०१४ मध्ये राज्यात शिवसेना भाजपचे सरकार सत्तेवर आले मात्र युती सरकारच्या काळात भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता.शिवसेनेच्या या शिष्टमंडळात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप,शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढले होते.या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या होत्या.राजकीय घडामोडी घडण्याच्यापूर्वीच राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.या निवडणुकीत दुस-या क्रमाकांच्या जागा मिळालेल्या शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद मिळाले होते.काही दिवसांसाठी विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी काम पाहिले होते.मात्र पुढील काही महिन्यातच शिवसेनेने भाजपशी युती करीत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.त्टयानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुका या शिवसेना आणि भाजपने युती म्हणून लढवल्या.मात्र त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादामुळे युती तुटली त्यानंतर शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.मात्र २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता.त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते असा खळबळजनक दावा चव्हाण यांनी केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत अनैसर्गिक युती केल्याने बंडाचा निर्णय घेतला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात आहे.मात्र आज काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गौप्यस्फोट करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.२०१४ मध्ये राज्यात भाजप शिवसेनेचे युती सरकार असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव घेवून शिवसेनेचे एक शिष्टमंडळ आमच्याकडे आले होते विशेष म्हणजे या शिष्टमंडळात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते,असा दावा अशोक चव्हाण यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे. चव्हाण यांच्या या दाव्याला तेव्हाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही दुजोरा दिला आहे,२०१४ मध्ये राष्ट्रवादीने आधीच भाजपाला बाहेरून पाठिंबा जाहीर केला नसता तर चित्र वेगळं पाहायला मिळाले असते असेही माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Previous articleवेदांता फॉक्सकॉन प्रकरणी खोटारडेपणाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागावी
Next articleगॅस सिलेंडर वापरावर मर्यादा घातल्याने सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर निशाणा