मुंबई नगरी टीम
- राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही
- अन्यथा सभागृह चालू देणार नाही
- उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्रच नव्हे तर प्रबोधनकारांचे नातू
कोल्हापूर : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला सुनावले आहे.येत्या सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून,त्यापूर्वी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
भाजपने पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सोमवारपासून सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे.भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यानंतर आज कोल्हापूरात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान दिले आहे. “सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.सोमवारच्या आत जर संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही,त्यांची चौकशी सुरू केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी यावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवेदन करावे, नाही तर आम्ही या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही, असा इशारा यांनी दिला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संजय राठोड प्रकरणावर बोलताना “मुख्यमंत्री सत्यवादी असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही” असे वक्तव्य केले होते. राऊत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत हे मान्य आहे.प्रबोधनकार ठाकरेंचे ते नातू आहेत.मात्र व्यवहारात ते दिसत नाही. भूमिका घेताना त्यांना स्वत:च्या खुर्चीची काळजी घेत आहेत. त्यामुळे राऊतांना मुख्यमंत्री सत्यवादी कुठे दिसले, ते माहीत नाही.असा टोलाही त्यांनी लगावला.गेल्या काही महिन्यात मंत्र्यांशी संबंधित अनेक गुन्हे दाखल होत आहेत मात्र मुख्यमंत्री ठाकरे यावर काहीच भूमिका घेत नाहीत.पूजा चव्हाण प्रकरणात जर मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेऊन राठोड यांची हकालपट्टी केली नाही तर तोंड न उघडणाऱ्या या सरकारला अधिवेशनातही तोंड उघडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका पाटील यांनी घेतली.
या प्रकरणात वानवडी पोलिसांनी काय तपास केला हे जाहीर करावे. वानवडी पोलिसांचा आतापर्यंतचा तपास नेमक्या कोणत्या दिशेने आहे, हे सर्वसामान्य जनतेला कळले पाहिजे.आतापर्यंतच्या तपासावर पोलिसांनी ऑडिओ क्लिप मध्ये राठोड यांचे नाव नाही हे पाहिले का ?, असा सवालही पाटील विचारला.पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणा-या चित्रा वाघ यांना आताच कसा त्रास द्यायला सुरुवात झाली. अनेक मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही केली. चित्राताई वाघिणी सारख्या आहेत.त्या घाबरणाऱ्या नाहीत चोकशीची भीती दाखवून त्यांनी तुम्ही गप्प बसवू शकणार नाही असा हल्लाबोल त्यांनी केला.