संजय राठोडांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला मोर्चाचे राज्यभर चक्काजाम आंदोलन

मुंबई नगरी टीम

  • भाजपा प्रदेश महिला मोर्चाकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन
  • राज्यात १०० ठिकाणी तीव्र निदर्शने
  • अन्यथा महिला मोर्चातर्फे तीव्र आंदोलन

मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांची निष्पक्षपातीपणे चौकशी करुन त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चाकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. राज्यात १०० ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. सुमारे २० हजार महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. कोरोना चे सर्व नियम पाळून तीव्र आंदोलन करण्यात आले.

महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस दीपाली मोकाशी आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. आ. सीमा हिरे यांनी नाशिक येथे आंदोलनाचे नेतृत्व केले. आ. विद्या ठाकूर, आ. श्वेता महाले आणि आ. मनिषा चौधरी याही या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.

उमा खापरे म्हणाल्या की, पूजा चव्हाण या तरुणीचा संशयास्पद मृत्यू होऊन २० दिवस उलटूनही या प्रकरणात मुख्य संशयित असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कोणतीच कारवाई केली गेली नाही. आत्तापर्यंत अनेक पुरावे माध्यमाच्या मार्फत आले आहेत. या पुराव्यांची दखल घेऊन राज्य सरकारने पूजाला न्याय देणे अपेक्षित आहे. संशयित मंत्र्याकडून राजीनामा घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक असताना मुख्यमंत्री मात्र मुग गिळून गप्प बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणात लक्ष घालुन या प्रकरणातील सर्व संशयित आरोपीचा शोध घेऊन चौकशी करावी व राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अन्यथा महिला मोर्चातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही खापरे यांनी दिला.

Previous articleउद्धवजी.. सोमवारच्या आत संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर ! चंद्रकांतदादांचा इशारा
Next article‘मी’ आमदारकीचा राजीनामा दिला नाही,फक्त मंत्रिपद सोडलं : संजय राठोड