‘मी’ आमदारकीचा राजीनामा दिला नाही,फक्त मंत्रिपद सोडलं : संजय राठोड

मुंबई नगरी टीम

  • राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपविला
  • पूजा चव्हाण प्रकरण भोवले
  • सव्वा वर्षानंतर ठाकरे सरकारमधील पहिल्या मंत्र्याचा राजीनामा

मुंबई । अखेर पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्याला लागला आहे.राठोड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून राजीनामा सोपवला आहे.राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजपने आक्रमक होत अधिवेशन चालू न देण्याचा इशारा दिला होता.तर आपण आमदारकीचा राजीनामा दिला नाही,फक्त मंत्रिपद सोडलं अशी प्रतिक्रिया राजीनामा दिल्यानंतर राठोड यांनी दिली.

पूजा चव्हाण या बीडच्या तरूणीने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत आरोप केल्याने वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते.या प्रकरणात भाजपने नाव घेतल्यानंतर ते १५ दिवस गायब होते.या दरम्यान त्यांनी त्यांच्यावरील आरोपांसंदर्भात कसलाही खुलासा केला नव्हता त्यामुळे संशय बळावला होता.राठोड प्रकरणी भाजपच्या नेत्यांनी आक्रमक होत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.भाजपच्या महिला मोर्चाने राज्यभर आंदोलन केल्याने राठोड यांच्या राजीनाम्यावरून सरकारवर प्रचंड दबाव होता.

उद्यापासून राज्य विघिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून,या पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड यांनी आज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या समवेत त्यांच्या हे शीतल आणि मेहुणे सचिन नाईक उपस्थित होते.पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी यावेळी केली. राठोड यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी नगरविरकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी स्वतंत्र दालनात चर्चा झाली.या चर्चेनंतर राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला.मी आमदारकीचा राजीनामा दिला नाही,फक्त मंत्रिपद सोडलं,अशी प्रतिक्रिया राजीनाम्यानंतर संजय राठोड यांनी दिली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी,हीच माझी मागणी आहे,मात्र विरोधकांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे पदावरुन पायउतार झाल्याचे राठोड यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे.बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला.मात्र अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी प्रसारमाध्यम आणि समाज माध्यमातून घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. माध्यमातून माझ्या समाजाची आणि माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार घडला.गेली तीस वर्ष मी केलेले राजकीय आणि सामाजिक काम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे.याचा तपास व्हावा, मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावे, ही माझी भूमिका आहे असेही राठोड म्हणाले.माझ्यासोबत परिवहनमंत्री अनिल परब,खासदार अनिल देसाई होते,मी सध्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.आमदारकीचा राजीनामा दिला नाही. चौकशीनंतर परिणाम भोगायला पाहिजे होते, परंतु विरोधकांनी अधिवेशन चालू देणार नाही, संविधानाच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात असून,अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा दिल्याने पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला असेही राठोड यांनी सांगितले.

“बूंद से गयी वो हौदसे नही आती” : फडणवीस

दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.संजय राठोडांनी राजीनामा दिला असला,तरी पूजाला न्याय मिळायला हवा आणि त्यामुळे राठोड यांना अटक करा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.ज्या दिवशी पूजा चव्हाण प्रकरण बाहेर आले त्याच दिवशी राठोड यांनी राजीनामा यायला हवा होता. एवढे पुरावे असताना राठोड यांनी मंत्रीपदावर रहायला नको होते. राजीनामा दिला खरे पण ते स्वीकारतील का नाही अजून माहित नाही,अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार आहेत ? राजीनामा घेतला आहे पण एफआयआर दाखल झाला पाहिजे. बूंद से गयी वो हौदसे नही आती, असेही फडणवीस म्हणाले.

Previous articleसंजय राठोडांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला मोर्चाचे राज्यभर चक्काजाम आंदोलन
Next articleनाना पटोंलेंसह काँग्रेसचे मंत्री,आमदार मोटारी ऐवजी सायकलने विधानभवनात येणार