१०० कोटींचा भूखंड कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात ; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई नगरी टीम

नागपूर । हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. नागपूरातील १०० कोटी रुपये किंमतीचा भूखंड एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात घातला असून न्यायालयानेही या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक मिनीटही खूर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने केली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

विधिमंडळाच्या पायऱ्यावर मविआने ईडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली, त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर ताशेरे ओढलेले आहेत. एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला असताना ते पदावर कसे राहू शकतात? महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख व संजय राठोड यांच्यावर आरोप होताच त्यांनी राजीनामे दिले. मग मुख्यमंत्र्यांवर एवढा गंभीर आरोप झाला असून न्यायालयानेही ताशेरे ओढले असताना ते खूर्ची का सोडत नाहीत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही विरोधी पक्षांची मागणी असून सभागृहातही आम्ही ही मागणी लावून धरू असे पटोले म्हणाले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आणि विधीमंडळ सदस्यांची बैठक काँग्रेस विधिमंडळ पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत विधीमंडळाच्या कामकाजासंदर्भात व्यूहरचना ठरवण्यात आली तसेच सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते.विधानभवनच्या पायऱ्यावर मविआच्या सदस्यांनी, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, पन्नास खोके, एकदम ओके, मुख्यमंत्री राजीनामा द्या, महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपाचा धिक्कार असो, जय भवानी, जय शिवाजी, अशा घोषणा देण्यात आल्या.

Previous articleगुजरातला फॉक्सकॉन आणि महाराष्ट्राला मिळाला ‘पॉपकॉर्न’ ; विरोधकांची घोषणाबाजी
Next article“तो” प्रश्न राखून ठेवल्याने मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह काही आमदारांच्या अडचणी कायम