मुंबई नगरी टीम
मुंबई । भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.पंकजा मुंडे यांनी केलेली मागणी रास्तच असून, महाविकास आघाडीतील एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको.त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे,अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काल पत्रकार परिषद घेत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणल्यानंतर त्यांनी 20 दिवसानंतर संजय राठोड यांचा राजीनामा घेतला.विरोधी पक्ष, जनता आणि माध्यमांचा दबाव वाढला नसता तर राठोड यांचा राजीनामा घेतला नसता. पण उशिरा का होईना नैतिकतेच्या आधारे त्यांचा राजीनामा घेतला. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची केलेली मागणी रास्तच आहे.नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून मुंडे यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता. महाविकास आघाडीतच एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको,असे सांगत मुंडे यांनीही त्वरीत राजीनामा द्यावा. राष्ट्रवादी पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली.