मुंबई नगरी टीम
बारामती । राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेत रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी प्रत्येक पक्षांच्या ४ नावांची शिफारस सुमारे चार महिन्यांचा कालावधी उल़टून गेला असतानाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या नावांना मंजूरी दिली नसल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करीत राज्यपालांवर निशाणा साधला आहे.महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज बारामती येथे पत्रकारांशी बोलत होते.त्यावेळी त्यांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांचा प्रलंबित असलेल्या नियुक्त्या,पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणूका,शेतकरी आंदोलन,साक्षी महाराज आदी विषयांवर भाष्य केले.राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्ता प्रलंबित असल्याबाबत त्यांनी विचारले असता पवार म्हणाले की,राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्य सरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यपालांची असते.आमची अपेक्षा अशी होती की पंतप्रधान मोदी स्वतः ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी राज्यपालांकडून त्यांना अशा प्रकारची अडवणूक होत असल्याची त्यांची तक्रार होती.तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते हे माझ्या पाहणीत आहे. दुर्दैवाने त्यांना हे सहन करावं लागलं हे त्यांच्या राज्यात सुध्दा.महाराष्ट्रासारख्या राज्यात राज्यपाल करतायत आणि असे असताना केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेतेय ही गोष्ट चिंताजनक आहे असेही पवार म्हणाले.
पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीसंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल.पाच राज्यातील निवडणूकांवर आज सांगणे कठीण आहे परंतु लोक निर्णय घेत असतात पण त्या राज्यांची स्थिती मला माहित आहे.त्यामध्ये माझ्या दृष्टीने केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत.राज्यही त्यांच्या हातात आहे.त्यामुळे केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल यात शंका नाही असा दावाही पवार यांनी केला.तामिळनाडूमध्ये आजची परिस्थिती लोकांच्या मनाचा कौल हा स्टॅलिन, डीएमके यांच्याबाजुने आहे. ते राज्याचं सूत्र हातात घेतील लोक त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देतील असेही पवार यांनी स्पष्ट केले.
पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे.तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय.तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत.त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते.त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे एक राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल असेही पवार म्हणाले.
कृषी कायद्यासंदर्भाच्या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत तशी संसदही अस्वस्थ आहे त्यामुळे त्याची प्रतिक्रिया उद्या संसदेत उमटली तर चुकीचे ठरणार नाही.शेतकरी आंदोलनाला १०० दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आहेत.शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारने सामंजस्यपणाची भूमिका घेतली नाही आणि संसद बंद पडली. दोन्ही सभागृह चालू शकली नाहीत. त्यामुळे उद्या (सोमवारी) काय होतेय हे पहावे लागेल असेही पवार म्हणाले.काही लोकांचं बेजबाबदारपणे बोलण्याचं वैशिष्ट्य असतं त्यामुळे अशा लोकांवर काय भाष्य करावं त्यांना महत्त्व न देणं हेच त्यांना उत्तर आहे अशा शब्दात त्यांनी भाजपचे साक्षी महाराज यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे.कुणी शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणत असतील कोण दहशतवादी म्हणत असतील तर अशा लोकांवर काय भाष्य करावं असा टोला मिश्किल हास्य करत पवार यांनी लगावला.