सरकारचा मोठा निर्णय : हेमंत नगराळे नवे पोलीस आयुक्त,पोलीस दलात मोठे फेरबदल

मुंबई नगरी टीम

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणामुळे अखेर राज्य सरकारने पोलीस दलात मोठे बदल केले आहेत.मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असून,त्यांच्या जागी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिन वाझे प्रकरणात राज्य सरकार अडचणीत आल्याच्या पार्श्वभूमीवर गेली दोन दिवस मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी आणि सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री आणि पोलीस अधिका-यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांची दोनच दिवसांपुर्वी भेट घेतली होती.वाझे प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा मलिन होवू नये म्हणून आज बुधवारी तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक पार पडली.त्यामुळे वाझे प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी होणार अशी चर्चा होती.अखेर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटकरून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीची माहिती दिली.परमबीर सिंग यांना हटवून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची वर्णी लाववण्यात आली आहे.परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.त्याच सोबत रजनीश शेठ यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कोण आहेत हेमंत नगराळे ?
नवे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून,नुकताच त्यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. २०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलिस आयुक्तही होते.त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची नागपुर मध्ये बदली करण्यात आली होती. याआधी नगराळे हे पोलीस महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) या पदावर कार्यरत होते. वाझे प्रकरणानंतर आता त्यांची मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

Previous articleदुपारी चालणारे सरकार आता सकाळी नऊ वाजता चालते : दरेकरांची टीका
Next articleमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसने केले गंभीर आरोप !