मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येला आळा घालण्यासाठी राज्यात दोन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा आज किंवा उद्या बुधवारी होण्याची शक्यता असून,याच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.या लॉकडाऊनकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले असल्याने दोन आठवड्यांच्या लॉकडाऊनमध्ये कोणकोणते निर्बंध लागू केले जाणार याचीच चर्चा आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने राज्यात किमान दोन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे.राज्यातील या संभाव्य लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वच बाजारपेठांमध्ये तुफान गर्दीचे चित्र आहे.राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या दोन आठवड्यांच्या लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गेल्या वर्षीप्रमाणे अत्यंत कडक लॉकडाऊन न लावता,सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक गोष्टींसाठी सूट देण्याबरोबरच हातावर पोट असणाऱ्या वर्गातील नागरिकांना काही प्रमाणात आर्थिक मदत करण्यासंदर्भातही नियोजन राज्य सरकार करत असल्याचे समजते.मात्र,या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक गोष्टी सुरू ठेवल्या जातील.भाजीपाला,अन्नधान्य, दूध,अंडी आणि इतर आवश्यक गोष्टीसाठी सवलत मिळण्याची शक्यता आहे.अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी काही उद्योगांना सवलत मिळू शकते.मात्र पर्यटन आदी गर्दी होणारी ठिकाणे बंद ठेवली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गेल्या लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय मजूर कुटुंबासह शेकडो किलोमीटर पायी चालत आपल्या राज्यात गेले होते. त्यावेळी त्यांचे प्रचंड हाल झाले होते.त्यामुळे राज्या बाहेरील रेल्वे सेवा सुरूच ठेवण्याची शक्यता आहे. शिवाय गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतील लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद करण्याचीही शक्यता आहे.लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच प्रवासाची सवलत देण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनसंदर्भात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,यासंदर्भात घाईने निर्णय न घेता जनतेला याबाबत वेळ देण्यात येईल.लॉकडाऊन हा शब्द लोकांच्या मनात भीती निर्माण करणारा आहे.रात्री आठ वाजता यायचे आणि लोकांसमोर बोलायचे असे होणार नाही.राज्य सरकारला कोरोनाची साखळी तोडायची आहे. त्यामुळे लोकांना सोबत घेऊन लोकांचे म्हणणे ऐकून आम्हाला हे करायचे आहे. पुढील काळासाठी चांगल्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत असेही शेख म्हणाले.यासंदर्भात आज मार्गदर्शक सूचना तयार होतील त्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यावर निर्णय घेईल,असेही शेख यांनी स्पष्ट केले.
काय बंद राहू शकेल ?
मॉल्स,दुकाने,उपाहारगृहे,बार,इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने
मद्यविक्री दुकाने,उद्याने,चित्रपटगृहे,नाट्यगृहे,गर्दी होणारी ठिकाणे
सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे,बंद राहू शकतात.तसेच प्रवासावरही निर्बंध येवू शकतात.
काय सुरू राहू शकेल ?
अत्यावश्यक सेवा,जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने,वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस
ऑटोमोबाईल दुकाने,सुरू ठेवण्यात येतील.