मुंबई नगरी टीम
मुंबई । कोरोनाच्या संकटाने अगोदरच शेतकरी होरपळून निघालेला असताना केंद्र सरकारने केलेली खतांची दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे,अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली असून,पवार यांनी केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीची दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
On the backdrop of #COVID19 Pandemic situation, I would highly appreciate if more relief will be given to the farmers community.@DVSadanandGowda @PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 18, 2021
खतांच्या वाढत्या किमतीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करीत केंद्रीय खते आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिले आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जनतेवर मोठा परिणाम झाला असून,त्यात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.कोरोना संकटाचा परिणाम शेतकऱ्यांवरही झाला आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्याची गरज आहे.मात्र, असे असताना शेतकऱ्यांना मदत करण्याचे सोडून सरकारने खतांच्या दरांमध्ये वाढ केल्याचे मी ऐकले आहे.अगोदरच लॉकडाऊनमुळे बाजार पूर्णपणे कोलमडला आहे.त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे.अशा वेळी केंद्राचा हा निर्णय थेट शेतकऱ्यांवर परिणाम करणारा आहे.एकीकडे इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यात कोरोनाचे संकट आहे,असे असताना सरकारने खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशी टीका पवार यांनी या पत्राद्वारे केली आहे.खतांच्या किमती वाढवण्याचा हा निर्णय धक्कादायक असून, त्याचा पुनर्विचार करुन तो मागे घेण्यात यावा,अशी मागणी पवार यांनी या पत्रात केली आहे.