मुंबई नगरी टीम
मुंबई । मुंबई आणि काही शहरे वगळता राज्यातील २१ जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढणारी संख्या आणि मृत्यूदर पाहता महाराष्ट्रातला लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातला लॉकडाऊन सरसकट हटवला जाणार नसला तरी काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात येणार आहे.याबाबतची नियमावली येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने १ जून पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत.त्याची मुदत येत्या चार दिवसात संपत असल्याने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.सध्याच्या लागू असलेल्या निर्बंधामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या अटोक्यात आली असली तरी या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.राज्यात लॉकडाऊन वाढवण्यास व्यापारी संघटनांनी विरोध केला असतानाच आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात येते.राज्यातला लॉकडाऊन सरसकट हटवला जाणार नसला तरी सध्या लागू असलेल्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता देण्यात येणार असून,याबाबतची नियमावली येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यात “ब्रेक द चेन” अंतर्गत ५ एप्रिल रोजी कडक निर्बंध लागू करण्यात आले.त्यानंतर सुद्धा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पुन्हा १५ मे पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा १ जून पर्यंत निर्बंध वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.या लॉकडाऊनमुळे काही शहरातील रूग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे चित्र आहे.मात्र ग्रामीण भागात कोरोना रूग्ण संख्या आणि मृत्यूदर वाढतच असल्याचे संध्याचे चित्र आहे.राज्यातील २१ जिल्ह्यात बाधितांची संख्या जास्त असल्याने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.लॉकडाऊन वाढवण्यात आला असला तरी काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्बंधांच्या शिथीलतेबद्दल निर्णय घेण्यात येवून त्यासंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.