मुंबई नगरी टीम
मुंबई । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याचे मुख्यमंत्री गेली काही महिने आपल्या मंत्रालयातील कार्यालयात फिरकले नाहीत.त्यामुळे त्यांना भेटणे आणि निवेदन देणे मुश्कील झाल्याने युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या केबिनला निवेदन चिटकवून निषेध नोंदवला आहे.
मुख्यमंत्र्यांनी कॅबिनचा चेहरा पाहिला नाही कॅबिने मुख्यमंत्र्यांचा चेहरा पाहिला नाही pic.twitter.com/ztdfsSjNtg
— MLA Ravi Rana (@mlaravirana_ysp) May 28, 2021
गेल्या वर्षापासून राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि मंत्रालयात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर असलेल्या कार्यालयाऐवजी वर्षा निवासस्थानातून कामकाज सुरू केले आहे.वर्षावरून ते राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती आणि विविध बैठका या दूरदृश्य प्रणालीद्वारे घेवून संवाद साधत आहेत.मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्रालयात उपस्थित न राहता ते दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत आहेत.गेली वर्षभर स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन वगळता खबरदारी म्हणून मंत्रालयात येणे त्यांनी टाळले आहे.मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट होत नसल्याने आणि आपले गा-हाणे त्यांच्यापुढे मांडता येत नसल्याने युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आणि आमदार रवी राणा यांनी चक्क आज मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयाच्या दरवाजावर निवेदन चिकटवून निषेध नोंदवला.
आमदार रवी राणा यांनी फेसबुकवर पोस्ट करीत यांची माहिती दिली आहे.मुख्यमंत्र्यांनी केबिनचा चेहरा पाहिला नाही,केबिनने मुख्यमंत्र्यांचा चेहरा पाहिला नाही अशा शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.आमदार राणा यांनी आज मंत्रालायातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात जावून मुख्यमंत्री कार्यालयाच्या दरवाजावर आपले निवेदन चिटकवले.कोरोना संक्रमणाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक मुद्द्यावर सरकारकडून उपाययोजना व नियोजन करण्यासाठी आपण संबंधितांना आदेश द्यावेत असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.सरकारकडून घोषित करण्यात आलेली मदत अद्यापही नागरीकांना मिळालेली नाही.अमरावती जिल्ह्यात कडक टाळेबंदी लावल्याने गोर-गरीब नागरीक संकटात सापडले आहेत.त्यांना दिलासा देण्याकरीता मुख्यमंत्री म्हणून तुम्ही निर्णय घेवून दिलासा द्यावा अशी मागणी राणा यांनी केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटच होऊ शकत नाही.त्यामुळे त्यांच्या केबिनला आपल्या मागण्यांचे चिटकवले असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.

















