मुंबई नगरी टीम
मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री ८: ३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.मुंबई,पुणे वगळता राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू असल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता असून,काही प्रमाणात निर्बंध शिथिल होवू शकतात.मात्र आंतरजिल्हा प्रवासासाठी आवश्यक असणारा ई-पास अजून काही दिवस बंधनकारक करण्यात येवून, येत्या १५ जूननंतर जिल्हाबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री ८:३० वाजता समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत.राज्यात अजून १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे एकदम लॉकडाऊन उठवण्याऐवजी शिथिलता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार असल्याने वाढवण्यात येणा-या लॉकडाऊनची नियमावली मुख्य सचिव सिताराम कुंटे हे उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे.१ जूनपासून हॉटेल,मद्यविक्रीची दुकाने, अन्य सेवांच्या दुकानांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. हॉटेल,मद्यविक्रीच्या दुकानातून केवळ पार्सल सेवा सुरू असेल असे समजते.मुंबईतील लोकल सेवा अजून काही दिवस सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात येईल.
रूग्ण संख्या कमी असलेल्या जिल्ह्यात जिल्ह्यांअंतर्गत सार्वजनिक वाहतूक ५० टक्क्यांने सुरू केली जाण्याची शक्यता आहे.मात्र ई-पासशिवाय आंतरजिल्हा प्रवास करता येणार नाही असा निर्णय घेतला जाणार असून, १५ जूननंतर जिल्हाबंदी उठविण्याचा निर्णय घेतला जाईल असेही या सूत्रांनी सांगितले.मुंबई,पुणे शहरातील रूग्णांची संख्या घटल्याने कडक निर्बंधात आता सवलती मिळण्याची शक्यता आहे.