दिलासा : एसटी कर्मचा-यांच्या वारसांना मिळणार अनुकंपा तत्त्वावर नोकरी

मुंबई नगरी टीम

मुंबई । एसटी महामंडळाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याचा अन्य कारणांमुळे किंवा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.यासंदर्भात महामंडळाने परिपत्रक जारी केले आहे.

सेवेत असताना एखाद्या कर्मचा-याचा मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येते.मात्र गेल्या दी़ड वर्षापासून राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे.महामंडळाला अनेक समस्यांनी ग्रासले असतानाच आतापर्यंत एसटी महामंडळातील २६५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.अशा कर्मचा-यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय झालेला असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती.याबाबत निर्णय होत नसल्याने अशा वारसांकडून वारंवार विचारणा करण्यात येत होती. शेवटी कोरोनामुळे आणि अन्य कारणाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यासंदर्भातील परिपत्रकानुसार जारी करण्यात आले आहे.रिक्त जागेच्या उपलब्धतेनुसार अनुकंपा प्रकरणी नेमणूक देण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश या परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

Previous articleई-पासशिवाय आंतरजिल्हा प्रवास करता येणार का ? उद्या नियमावली जाहीर होण्याची शक्यता
Next article१५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला; दुकाने खुली ठेवण्याची वेळ वाढवली