मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ‘सफाई कर्मचारी आयोग कक्ष हे स्वतंत्र कार्यासन निर्माण करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.१ जुलै रोजी सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नी झालेल्या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा शब्द सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ५ दिवसातच पूर्ण केला आहे.
या शासन निर्णयानुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या आयोगासंबंधीची सर्व कामे व सफाई कर्मचार्यांशी संबंधित अन्य सर्व बाबी या नवीन कक्षाकडे हस्तांतरित करण्यात आल्या असुन,या कार्यासनास कक्ष अधिकारी,सहाय्यक कक्ष अधिकारी, लिपीक, टंकलेखक आदी पदांसाठी अधिकारी,कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.सामाजिक न्याय विभागांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय १ जुलै रोजी झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे यांनी घेतला होता.हाताने मैला उचलणाऱ्या मृत सफाई कामगारांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीतली २१ प्रकरणे प्रलंबित आहेत,ही सर्व प्रकरणे तातडीने निकाली निघावीत,सफाई कर्मचाऱ्यांचा घराचा अनुशेष भरून काढणे,वारसा हक्क कायदा,ठेकेदारी पद्धत बंद करणे यांसारखे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेला स्वतंत्र कक्ष पूर्ण क्षमतेने काम करणार आहे.