ओबीसी आरक्षण प्रश्नावर सरकारला उघडे पाडल्यामुळे १२ आमदारांचे निलंबन

मुंबई नगरी टीम

मुंबई । अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्यामुळे भाजपच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे.तर विरोधी पक्षाची सभागृहातील संख्या कमी करण्याचा प्रयत्न असून,ओबीसी आरक्षण प्रश्नावर सरकारला उघडे पाडल्यामुळे खोटे आरोप लावून सरकारने भाजपाचे १२ आमदारांचे निलंबन केले,अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना आज एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.पराग अळवणी ( विलेपार्ले), राम सातपुते ( माळशिरस), संजय कुटे ( जळगाव जामोद), आशिष शेलार ( वांद्रे पश्चिम), अभिमन्यू पवार( औसा), गिरीश महाजन ( जामनेर),अतुल भातखळकर ( कांदिवली), शिरीष पिंपळे ( मुर्तीजापूर), जयकुमार रावल ( सिंदखेड), योगेश सागर ( चारकोप), नारायण कुचे ( बदनापूर) आणि किर्तीकुमार भांगडिया या भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले.या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्याने त्यांना मुंबई आणि नागपूरात होणा-या वर्षभरातील अधिवेशनाला उपस्थित राहता येणार नाही.

१२ आमदारांच्या निलंबनानंतर विधानभवनात पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.ओबीसी आरक्षण प्रश्नावर सरकारला उघडे पाडल्यामुळे खोटे आरोप लावून सरकारने भाजपाचे १२ आमदार आज निलंबित केले अशी टीका करतानाच,हवे तर सर्व १०६ आमदार निलंबित करा असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.ओबीसी आरक्षण परत मिळण्यासाठी आमचा संघर्ष असाच सुरू राहील,असेही त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणावर हे सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे अशा टीका केली.१२ आमदारांचे निलंबन हा एका नियोजित कटाचा भाग आहे. तालिका सभापतींना कोणतीही शिवीगाळ भाजपाच्या सदस्यांनी केली नाही.विरोधकांची संख्या कमी केली तर आपल्यावर कमी टीका होईल, असे राज्य सरकारला वाटते अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

Previous articleभास्कर जाधवांना धक्काबुक्की करणा-या भाजपच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन
Next articleधनंजय मुंडेंनी ५ दिवसातच शब्द केला पूर्ण; सफाई कर्मचाऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय