मुंबई नगरी टीम
मुंबई । कोकणाला अतिवृष्टीचा धोका असल्यामुळे कोकणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची विनंती आपण राज्य सरकारकडे केली होती. परंतु सरकारने याविषयी तातडीने कुठलेही गंभीर पाऊल उचलले नाही.राज्य सरकारचा बेफिकिरपणा व ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती निर्माण होऊन याचा फटका कोकणवासियांना बसल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
गेल्या १० दिवसांपासून मुंबईची तुंबई झाली,दरडी कोसळून अनेक लोकं मृत्युमुखी पडली, तसेच कोकणातही हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असूनही राज्य सरकारने कोकणात कोणतेही पूर्वनियोजन केले नाही. प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडली असून कोकणवासीयांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले की, कोकणातील नद्यांना पूर आला असून, कोकणवासीयांना तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. कोकणातील अनेक गावे पाण्याखाली गेली असून लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला कपड्यांपासून जेवणापर्यंत व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. या संकटच्या परिस्थितीत राज्य सरकारने युद्धपातळीवर नियोजन करण्याची गरज आहे. परंतु एनडीआरएफची टीम अजूनही कोकणात पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे यामधून राज्य सरकारची बेफिकिरी, निष्काळजीपणा दिसून येत आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.
कोकणात एनडीआरएफची स्टँड बाय टीम ठेवण्यात यावी, जेणेकरून काही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास घाई होणार नाही. एक टीम महाड, चिपळूण, रत्नागिरी येथे ठेवण्यात यावी. मुख्य शहारामध्ये जर तासाभराच्या अंतरावर एनडीआरएफची टीम असेल तर उपाययोजना तातडीने करता येईल. त्या टीम संकटकाळी कोकणवासीयांच्या मदतीला तात्काळ धावून येतील हा त्यामागील उद्देश्य होता, असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, स्थलांतरित नागरिकांसाठी वेळीच राहण्यासाठी जागेची व्यवस्था केली असती तर आता आलेले अतिवृष्टीचे संकट तोंडाशी आल्यावर नागरिकांसाठी जागा शोधण्याची वेळ सरकार व पर्यायाने प्रशासनावर आली नसती. या कृतीमधून तहान लागली की विहीर खोदा, अशा प्रकारचा राज्य सरकारचा निष्काळजीपणा दिसून येत असल्याचा टोलाही दरेकर यांनी लगावला.