राज्यातील बंधू-भगिनींच्या आपुलकीच्या शुभेच्छांमुळे भारावून गेलोय : अजित पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई । “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण सर्वांनी व्यक्त केलेला स्नेह व दिलेल्या शुभेच्छांमुळे माझ्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झाला असून महाराष्ट्रासाठी अधिक समर्पित होऊन काम करण्याचं बळ मिळालं आहे. आपल्यासारख्या हितचिंतकांचा स्नेह,सदिच्छा माझ्यासाठी मोलाच्या असून या सदिच्छांनी मला कायम बळ दिलं आहे. यापुढच्या काळातही आपल्या सदिच्छा, स्नेह कायम माझ्यासोबत राहील. आपण सर्व मिळून समर्थ, सक्षम, समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार करुया…”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी आज वाढदिवस साजरा केला नाही. मात्र, दूरध्वनीद्वारे तसेच डिजिटल माध्यमातून आलेल्या शुभेच्छांचा आवर्जून स्विकार केला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य हितचिंतकांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. समाजाच्या सर्व घटकांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला. राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून मनाचा मोठेपणा दाखवत माझं कौतुक केलं. पत्रकार बंधू-भगिनींनीही आजवरच्या कार्याची आवर्जून दखल घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकोपयोगी उपक्रम राबवून माझा वाढदिवस साजरा केला. आपल्या सर्वांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. राज्यातल्या आपण सर्व बंधु-भगिनींनी दिलेल्या आपुलकीच्या शुभेच्छांमुळे मी भारावून गेलो आहे. आपल्या सर्वांचे मी कृतज्ञतापूर्वक जाहीर आभार मानतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेने व्यक्त केलेल्या स्नेहाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र सध्या कोरोना संकटाशी लढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला, राज्याला कोरोनामुक्त ठेवण्यात योगदान द्यावे, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर आभार मानताना आवर्जून केलं आहे.

Previous articleराज्य सरकारचा बेफिकिरपणा व ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती
Next articleतुम्ही स्वत:ला सावरा,बाकीचं आमच्यावर सोडा,आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू