मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे आवश्यक असल्याने सहकारी संस्थांना वार्षिक सर्वधारण सभा ऑनलाईन घेण्यास परवानगी देण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करुन आता ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास सहकार विभागाने परवानगी दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहकारी संस्थांना प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मनाई करण्यात आली होती.तर सहकारी संस्थांना वार्षिक सर्वधारण सभा ऑनलाईन घेण्यास परवानगी देण्यात आली होती. आता राज्यातील कोरोनाची रूग्ण संख्या घटत असल्याने ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी सहकार विभागाने परवानगी दिली आहे.तसेच ५० पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी व्हीसी अथवा ओएव्हीएमद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे. संस्थेच्या प्रत्येक सभासदास वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक, वेळ, ठिकाण व ऑनलाईन लिंक याबाबतची माहिती किमान सात दिवस अगोदर एसएमएस,मेल,वॉटसअॅपद्वारे कळविण्यात यावे अशाही सूचना सहकार विभागाने या आदेशात दिल्या आहेत.वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस संस्थेच्या नोटीस बोर्डवर,संस्थेच्या शाखांची कार्यालये या ठिकाणी लावण्यात यावीत. तसेच ज्या सभासदांचे ईमेल,पत्ता किंवा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नसेल अशा सभासदांना बैठकीत चर्चेसाठी असणा-या विषयाबाबतची माहिती सात दिवसात पत्राद्वारे पोहोच करावी. सर्व सहकारी संस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतच्या माहितीची जाहिरात संस्थेचे कार्यक्षेत्र विचारात घेवून, किमान एक स्थानिक वर्तमानपत्र, एक जिल्हा वर्तमानपत्र किंवा राज्य दर्जा असलेल्या मराठी किंवा इंग्रजी वर्तमानपत्रात यावी.वर्तमानपत्रात जाहिरात देताना त्यामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात यावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.