न्यायालयाने निलंबन रद्द केल्यामुळे १२ आमदारांना विधानभवनात प्रवेश द्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याने भाजपाच्या १२ आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध,घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले असल्याचे विधानभवन सचिवांना पत्र लिहून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी अवगत केले आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे सदर आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याकडे ही सचिवांचे त्यांनी लक्ष वेधले आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित केल्याच्या विरोधात १२ आमदारांतर्फे आमदार  आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकाल २८ जानेवारीला दिला असून सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे निलंबन अवैध ठरवून रद्द केले आहे.आज याबाबत १२ आमदारांच्या वतीने भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सविस्तर कायदेशीर माहिती सचिवांना अवगत केली असून सोबत निवाड्यांची प्रत ही जोडली आहे. न्यायालयाने निलंबन रद्द केल्यामुळे यापुढे विधिमंडळाच्या मुंबई आणि नागपूर येथील विधानभवन परिसरात प्रवेशाचा आमचा मार्ग मोकळा केला आहे, याकडे विधानसभा सचिवालयाचे लक्ष वेधले आहे.

Previous articleविद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा
Next articleराज्यातील नेते म्हणाले..अर्थसंकल्प म्हणजे ” खोदा पहाड निकला चूहा “