बाळासाहेब ठाकरे यांच्या दर्शनासाठी अटकाव घालणे हे कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संपूर्ण देशाचे आहेत.राज्यातील जनतेने बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुह्रदयसम्राट म्हणून संबोधले असताना अशा थोर पुरुषांच्या दर्शनासाठी अटकाव घालणे म्हणजे कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन आहे, अशी टीका करत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी खासदार विनायक राऊत यांची मार्मिक शब्दात कान उघाडणी केली आहे

केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी व येथील समस्या जाणून घेण्यासाठी राज्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरु होत आहे. या जन आशीर्वाद यात्रेची माहिती विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार प्रसाद लाड, माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित होते. जन आशीर्वाद यात्रे दरम्यान नारायण राणे यांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट द्यायला शिवसैनिक देणार नाहीत, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, विरोध करायचा की नाही हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे. आमच्या दौऱ्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करणे हा कार्यक्रम असून तो आम्ही शांतपणे पार पाडणार आहोत. राणे साहेबांची राजकीय कारकीर्द बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली घडली असल्याचे जनतेने पहिले आहे. त्यांच्या हाताखाली तयार झालेला कार्यकर्ता आज केंद्रात मंत्री आहे. आज जर बाळासाहेब हयात असते तर हे पाहून त्यांनाही नक्कीच आनंद झाला असता. त्यांनी त्यांचे मनापासून कौतुकही केले असते. त्यामुळे छोट्या मनोवृत्तीचे नेते अशा थोर नेतृत्वाचे दर्शन घेत असताना विरोध करू शकत नाहीत, असेही दरेकर यांनी सांगितले.

Previous articleपूरग्रस्तांसाठी “खारीचा वाटा” उचलणा-या आदितीचे मंत्र्यांनी केले कौतूक
Next articleदोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा लढवलेल्या आशा बुचकेंचा भाजपात प्रवेश