मुंबई नगरी टीम
नागपूर । काल सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या ओबीसी आरक्षण बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या भेटीवर मत व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल बंद दाराआड चर्चा झाली.सुमारे पंधरा मिनिटे या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली मात्र कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अनेक तर्क लढविले जात असतानाच,महाराष्ट्राच्या भल्यासाठी अशी भेट होत असेल तर महाराष्ट्राला हेच अपेक्षित आहे.महाराष्ट्राच्या विकासासाठी अशा भेटी होणे काही गैर नसल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.आज नागपूरात एका कार्यक्रमासाठी सामंत आले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक विषयांवर भाष्य केले.राणे यांच्या अटकेनंतर राज्यात पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू झाली असल्याबाबत त्यांना विचारले असता,सामंत म्हणाले की, पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा प्रत्येक निर्णय शिवसैनिक म्हणून आम्हाला बंधनकारक आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेदरम्यान जशी अॅक्शन येईल,तशी रिअॅक्शन शिवसेनेकडून होईल,असा इशारा यावेळी सामंत यांनी भाजपला दिला. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर राज्यात केंद्रातील चार मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे.मात्र सध्या कोकणातील सुरू असलेलीच यात्रा गाजत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आमच्यासाठी दैवत आहेत.त्यांच्याबद्दल कोणी अपशब्द काढले तर शिवसैनिक ते खपवून घेणार नाही असे सांगतानात शिवसेनेला कोणीही शह देऊ शकत नाही,असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.