प्रवीण दरेकरांच्या केसाला हात तर लावून दाखवा ; डॉ. उज्ज्वला जाधव यांचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्ष यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या आणि प्रसिद्धीला हापापलेल्यांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या केसाला हात तर लावून बघा, भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाहीत,अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दरेकरांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांचा समाचार घेतला.

अभिनेत्री सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. या टीकेच्या विरोधात थेट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव या दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. पत्रकारांशी बोलतांना डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले की,राजकारणाच्या या कुरणात चरून चरून कुणाचे कशा कशाने गाल रंगले आहेत हे सर्वांना माहीत आहे. आमच्या आदरणीय नेत्याने योग्य तेच वक्तव्य केलंय त्याचा एवढा कांगावा कशाला करीत आहात ? महिलांच्या आडून राजकारण करणे थांबवा आणि जनतेच्या हिताची कामे करा . ज्यांची “बुंद से गयी वो हौद से नाहीं आती ” महाराष्ट्रात सध्या जो प्रसिद्धीचा खटाटोप चाललाय तो थांबवा, महिलांच्या सुरक्षेच्या बाबत मौनी बाबा होणाऱ्या महिला एका वक्तव्याने एवढ्या जागृत कशा झाल्या हाच आता जनते साठी चर्चे चा विषय आहे.भ्रष्टाचार ,शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरोना नियंत्रण, आणि विशेष म्हणजे महिलांवर दिवसा गणिक होणारे अत्याचार बलात्कार थांबायला हवेत,याचे जरा नियोजन करा.साकीनाका येथे घडलेल्या महिला बलात्काराच्या नंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करायला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना वेळ नव्हता की त्यांना माहिती मिळाली नाही ? काय करायचे असते ते कळलेले दिसत नाही. ऊठ सूट विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्याला समजून न घेता वेगळे वळण देऊन त्याचा बाऊ करायचा एवढेच काम राष्ट्रवादीच्या महिला करणार आहेत कां? या मुळे तुमच्या बुद्धीची पण झलक महाराष्ट्राला कळतेय याचे भान ठेवा. महिलांच्या प्रश्नावर जाणीव पूर्वक काम करत आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी करण्यात येईल या बाबत शासनाला धारेवर धरून आक्रमक भूमिका घेणार आहेत की नाही ? असा सवालही डॉ. उज्ज्वला जाधव यांनी केला आहे.

Previous articleजिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा
Next articleराष्ट्रवादीतील प्रवेशाचे माझे स्वप्न सत्यात आले; सुरेखा पुणेकर यांचे मनोगत