मुंबई नगरी टीम
मुंबई । गेली २० महिने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला राज्य महिला आयोगावर अध्यक्ष नेमता आलेला नाही.पण,लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते.त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बैठक घेऊन चाचपणी केली.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह ५ महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत
राज्यात आयोग,महामंडळे व प्राधिकरणे यांची संख्या ५८ इतकी आहे.त्यातील बहुतांश महामंडळाच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत. मात्र मध्यंतरी मुंबईत साकीनाका येथे निर्भया बलात्कार व हत्या प्रकरण घडले. त्यानंतर विरोधी पक्षाने महिला आयोगाचे पद रिक्त ठेवल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारवर टिकेचे मोठी झोड उठवली होती.आता महिला आयोगातील रिक्त पदे भरण्याचा सरकारचा मानस आहे.आघाडीतल ज्या घटक पक्षाकडे जे मंत्रालय असेल त्याच्या अधिपत्याखालील महामंडळ व प्राधिकरण इतर पक्षाला देण्यात येईल, असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे.त्यानुसार महिला व बालकविकास मंत्रालय काँग्रेसकडे आहे.त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे.राष्ट्रवादीत सध्या पाच महिला नावांची अध्यक्षपदासाठी चर्चा आहे.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह माजी आमदार विद्या चव्हाण,निवृत्त सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार,विदर्भातील पक्षाच्या नेत्या डॅा. आशा मिरगे आणि मराठवाड्यातील नेत्या व माजी आमदार उषा दराडे यांचे नावे चर्चेत आहेत.चंद्रा अय्यंगार या महिला व बालविकास विभागाच्या सचिव होत्या.
माजी आमदार विद्या चव्हाण यांच्यावर त्यांच्या स्नुषेने छळाचा गुन्हा नोंदवलेला आहे. त्यामुळे चव्हाण यांचे नाव मागे पडले आहे. एक व्यक्ती एक पद, या भूमिकेमुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नावही स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे अध्यक्षपदासाठी आता विदर्भातील आशा मिरगे आणि मराठवड्याच्या उषा दराडे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.त्यावर अजित पवार यांनी चर्चा केल्याचे समजते.डॅा. अशा मिरगे या विदर्भातील आहेत. २०१४ च्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी महिला आयोगावर सदस्य म्हणून काम केलेले आहे. मात्र शक्ती मिल बलात्कार प्रकरण आणि दिल्लीतील निर्भया प्रकरणी मिरगे यांची वक्तव्ये वादग्रस्त ठरली होती.उषा दराडे या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असून कायदेतज्ञ आहेत. त्या मराठवाड्यातील असून त्यांना विधानपरिषदेच्या कामाचा अनुभव आहे. तसेच पक्षाच्या उपाध्यक्ष राहिलेल्या दराडे यांनी पक्षाच्या महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळलेले आहे. त्या सामाजिक चळवळीतून पुढे आलेल्या नेत्या आहेत. एकुण महिला आयोगाला अध्यक्ष नसल्याने सुमारे ३ हजार ५०० प्रकरणे आयोगाकडे प्रलंबित आहेत. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी अनेकदा आयोगाला अध्यक्ष नेमावा, अशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे पत्राव्दारे मागणी केलेली आहे.