राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सेवानिवृत्तीनंतर मुख्य सचिवपदी सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सौनिक येत्या रविवारी मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून पदभार स्विकारतील. सौनिक सध्या वित्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी आहेत.

सौनिक मूळचे बिहारचे असून ते १९८७ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी कलकत्ता येथील सेंट झेविअर महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापिठातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. रायगड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळे येथे जिल्हाधिकारीपदी त्यांनी काम केले आहे. अमरावती विभागाचे विभागीय आयुक्तपदी काम केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि शेती स्वावलंबन अभियानाचे महासंचालक म्हणून काम केले आहे. नवी दिल्लीतील सेवा कालावधीत ऊर्जा विभाग आणि संरक्षण विभागात काम केले आहे. त्यांना वस्त्रोद्योग, अल्पसंख्यांक, गृह, परिवहन, सार्वजनिक बांधकाम अशा विभागातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे येत्या ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनंतर श्रीवास्तव यांची राज्य सेवा हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिवपदासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, मनोज सौनिक आणि महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची नावे चर्चेत होती. मात्र, मनोज सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मनोज सौनिक हे डिसेंबर २०२३ मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. तर नितीन करीर हे मार्च २०२४ मध्ये निवृत्त होतील

Previous articleबारसू प्रकल्प स्थानिकांच्या संमतीनेच ! लाठीमार झाला नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
Next articleआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होणार : अजित पवार यांचे संकेत