बारसू प्रकल्प स्थानिकांच्या संमतीनेच ! लाठीमार झाला नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई नगरी टीम

मुंबई । रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांशी आंदोलनकर्त्यांची झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केल्याने परिस्थिती चिघळली असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, विरोधकांचे सर्व दावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावले आहेत.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,बारसूत लाठीमार झालेला नाही. मी माहिती घेतली.उद्योगमंत्री आणि अधिकारी चर्चा करत आहेत. स्थानिकांना प्रकल्पात फायदा आहे, हे कळलं की शेतकरी स्वत:हून सहकार्य करतील. कुठल्याही परिस्थितीत जोरजबरदस्ती केली जाणार नाही. त्यासाठी जनसभा घेतल्या जातील, त्यांच्या संमतीनेच प्रकल्प पुढे नेला जाईल, असे शिंदे यांनी आश्वस्त केले.मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प आणून त्यांच्यावर अन्याय करणार नाही. ग्रामस्थांवर अन्याय करून प्रकल्प पुढे न्यायचा नाही, अशी सरकारची भूमिका आहे. येथील ७० टक्के पेक्षा जास्त स्थानिकांचे प्रकल्पाला समर्थन आहे, असा दावा शिंदे यांनी केला.

मी स्वतः उद्योगमंत्र्यांशी बोललो आहे. पोलीस अधिकारी, अधीक्षक यांच्याशी चर्चा झाली आहे. तिथे आता शांतता आहे. स्पॉटवर आता कोणी नाही. काही लोक तिथे आले होते, दहा पंधरा मिनिटे त्यांसोबत पोलिसांनी चर्चा केली. सध्या शांतता आहे. लाठीचार्ज केलेला नाही,असे जिल्हाधिकारी यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.कोकणवासियांना रोजगार देणारा हा प्रकल्प आहे. प्रकल्पाचा फायदा अधिकारी, कलेक्टर,एसपी, संबंधित विभागाचे अधिकारी समजावून सांगतील. या प्रकल्पाचा फायदा त्या भागातील लोकांना कसा होईल, हे स्थानिकांना सांगितले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Previous articleमॉरिशसमधील उद्योजकांपुढे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली महाराष्ट्राची बलस्थानं
Next articleराज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती