मुंबई नगरी टीम
मुंबई । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या करत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे भाजपचे षडयंत्र असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे यामागचे मास्टरमाईंड आहेत, असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मुश्रीफ यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सोमय्याच्या आरोपांना उत्तरे दिली.
मुश्रीफ म्हणाले की, “अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी माझा किंवा जावयाचा सूतराम संबंध नाही. ब्रिक्स इंडिया कंपनीमध्ये ४४ लाख शेअर कॅपिटल आहे. मग १०० कोटींचा घोटाळा होईल कसा? कोल्हापूर मध्यवर्ती बँकेचे या कारखान्याला कर्ज नव्हते, असा दावा मुश्रीफ यांनी केला. “सोमय्यांची सीएची पदवी खोटी आहे की काय अशी शंका येते, असे मुश्रीफ म्हणाले.”चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची मला ऑफर दिली होती. पण मी ‘पवार एके पवार’ असल्याने भाजपात गेलो नाही. महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात प्रबळ झाली आहे. पुढच्या १० वर्षांत भाजपला यश दिसत नाही, म्हणून वैफल्यातून बदनामी केली जात असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला.
“भाजपकडे कोल्हापुरात जिल्हा बँक, मनपा काहीच नाही. पाटलांचा कोल्हापूर होम डीस्ट्रीक्ट आहे. त्यामुळे पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन बदलायचे ठरलेले. पण अमित शाहा यांच्यासोबतच्या मैत्रीमुळे ते बचावले आहेत, असा दावा मुश्रीफ यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी जरा पुरुषार्थाने लढावे. माझ्या कुटुंबाची बदनामी करून त्यांना काही मिळणार नाही, असे मुश्रीफ म्हणाले.महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी भाजपकडून मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असे सांगून सोमय्या यांच्यावर १०० कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.