मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या शक्तीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. परंतु केल्हापुरचे पैलवान गडी हसन मुश्रीफ यांच्या बाहुत किती बळ आहे हे सांगण्यातच सध्या राऊत व्यस्त आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेस बद्दल एवढं आंधळं प्रेम संजय राऊत दाखवत आहेत.पवार यांच्याबद्दल निष्ठा व्यक्त करतानाच,महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी संजय राऊत शिवसेनेचं किती नुकसान करणार आहे,हे येणाऱ्या काळात समजेल अशी टिका विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
संजय राऊत सामना अग्रलेखातून टीका करताना महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्य स्थिति काय आहे, याचं भान राऊत यांना नाही. त्यांचा फक्त एकतर्फी कार्यक्रम सुरू आहे. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्यामुळे आघाडी सरकार आलं आहे त्यामुळे शिवसेनेचे काहीही होऊदे. परंतु ५ वर्ष हे सरकार टिकलं पाहिजे यासाठी केवळ राऊत यांची धावपळ सुरू असल्याचा टोलाही दरेकर यांनी लगावला. ईडी,सीबीआय यंत्रणेचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत असल्याचे सांगताना राज्यात आघडी सरकारमध्येही तपास यंत्रणांचा कसा गैरवापर चालला आहे हे राऊत सांगायला विसरत आहे का? असा सवाल करत दरेकर म्हणाले, राणे यांना तातडीने अटक करण्यात आली. किरीट सोमय्या यांना कारण नसतानाही ६ तास नजरकैदेत ठेवलं, एका लहान मुलीने केवळ उद्धव ठाकरे यांचं मीम्स फॉरवर्ड केलं म्हणून तिच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला, रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जेल मध्ये टाकण्यात आलं. अभिनेत्री कंगना रणावातचे ऑफिस घाईघाईत पाडण्यात आलं. मग त्यामध्ये तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला नाही का ? अतुल भातखळकर, चित्रा वाघ, किरीट सोमय्या यांना धमक्यांचे फोन आल्यानंतरही त्याची साधी चौकशी सुद्धा झालेली नाही. त्यांची तुम्हाला काळजी नाही का ? ज्येष्ठ गायिका लता दीदी, सचिन तेंडुलकर, अमिताभ यांची ट्विटरची चौकशी करावी, ही भाषा महाविकास आघाडी सरकारचीचं होती या सगळ्या गोष्टींचा सोयीस्कर विसर राऊत यांना पडला आहे का असा सवालही दरेकर यांनी केला.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्राला अशाप्रकारचे उत्तर देणे दुर्दैवी आहे. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा वाद प्रत्येक ठिकाणी उभा करणे दुर्दैवी आहे. राज्यपालांनी राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं, पालकत्वाच्या दृष्टीनं भूमिका मांडली आहे. त्यामुळे, राज्यपालांनी केलेल्या सूचना राज्य सरकारने सकारात्मकपणे घ्यायला हव्यात. राज्यापालांनी नमूद केलेल्या सूचने विषयी केंद्राकडे बोट दाखवून दूर पळता येणार नाही अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी व्यक्त केली.साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचं सांगत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे.परंतु राज्यपालांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी पाठविलेले उत्तर हे राजकीय स्वरुपाचे आहे. दरेकर म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात विनयभंग, अत्याचार, बलात्कार, हत्येच्या घटना हजारोंच्या संख्येनं झाल्या आहेत. त्यातच साकीनाक्याची घटना तर परिसीमा होती. मग अशावेळी राज्यापालांनी, वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी, महिला संघटनांनी मागणी केली असेल, तर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घ्यायला काहीच हरकत नाही. तसेच हे अधिवेशन केवळ टीका-टिप्पणीसाठी नाही. विरोधकही या विषयात काही चांगल्या सूचना सरकारला सुचवु शकतील. महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था सक्षम होण्यास अजून मदत होईल, या भूमिकेतून याकडे पाहिलं पाहिजे, असा सल्लाही दरेकर यांनी यावेळी ठाकरे सरकारला दिला.