राज्यपालांनी आपला हस्तक्षेप कमी करून पदाची प्रतिष्ठा राखावी : नाना पटोलेंचा टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई । साकीनाका निर्भया बलात्कार प्रकरणी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याचा सल्ला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राव्दारे दिला आहे.यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.मागील काही वर्षात विरोधी पक्षांच्या सरकारांमध्ये हस्तक्षेप करण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्यपालांनी पदाचा प्रतिष्ठा राखावी,अशी आमची त्यांना विनंती आहे, अशा शब्दात पटोले यांनी राज्यपालांना चिमटा काढला आहे.

महिला सुरक्षेच्या प्रश्नावर २ दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे ही राज्यपालांची सूचना व त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पटोले म्हणाले की, महिला सुरक्षेचा प्रश्न हा काही फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादीत नसून देशभरातील महिलांचा प्रश्न आहे. त्यामुळे संसदेचं ४ दिवसांचे अधिवेशन बोलवावे हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर योग्यच आहे. राजभवन हे भाजपाचे कार्यालय झाले आहे. राज्य सरकारमध्ये राजभवन वारंवार हस्तक्षेप करत आहे. राज्यपालांचे पद हे महत्वाचे व सन्माननीय पद आहे, त्याच्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादेतच काम केले तर अशी परिस्थिती उद्भवणार नाही परंतु राज्यपालांच्या माध्यमातून मागील काही वर्षात विरोधी पक्षांच्या सरकारांमध्ये हस्तक्षेप करण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्यपालांनी पदाचा प्रतिष्ठा राखावी, अशी आमची त्यांना विनंती आहे.

साकीनाका प्रकरणातही मुख्यमंत्र्यांनी योग्य व तात्काळ पावलं उचलत कारवाई केली. अशा प्रवृतींवर जरब बसवण्यासाठी कायदे आणखी कडक करण्याची गरज असेल तर तेही करावे. पण राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामकाजात किती हस्तक्षेप करावा हा चर्चेचा विषय झाला आहे, असे पटोले म्हणाले. भाजपशासीत राज्यांमध्ये साधू संतांच्या हत्या होत आहेत. भाजपाविरोधात बोलणा-या साधूंच्या हत्या झाल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. नरेंद्र गिरी यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या अनुयायांनी केला आहे. गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशात साधूंच्या हत्या झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदूचे तथाकथित रक्षक असल्याचे आव आणणारे सरकार राज्यात असतानाही हिंदू साधू संतांच्या हत्या होत आहेत हे अतिशय गंभीर आहे. उत्तर प्रदेशात आता राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असे पटोले म्हणाले.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा घटना हा चितेंचा विषय असून नुकतीच साकीनाका येथील घडलेली घटना पाहता महिला सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. शहरातील सोसायट्यामध्ये सर्वत्र पुरुष सुरक्षा रक्षकच तैनात असल्याचे दिसते. अशा सोसायट्यामध्ये पुरुषांसोबतच महिला सुरक्षा रक्षक असावेत अशी मागणी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली असल्याचे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

Previous articleहा तर सुर्यावर थुंकण्याचा प्रकार ; सुनिल तटकरेंचा अनंत गीतेंवर निशाणा
Next articleशिवसेनेचे काहीही होऊ दे,पण हे सरकार ५ वर्ष टिकलं पाहिजे; राऊतांचा एकतर्फी कार्यक्रम