मुंबई नगरी टीम
बीड । हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यानंतर हैराण झालेल्या अंबाजोगाई येथील वयस्क शेतकऱ्याने आपल्या लहानग्या नातवासह हातात नुकसानीची मोळी घेऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.अंबाजोगाई येथील आढावा बैठकीत कार्यकर्त्यांमधून मार्ग काढत या वयस्क शेतक-याने भेट घेतली.
अंबेजोगाई येथील आढावा बैठकीत कार्यकर्त्यांमधून मार्ग काढत हे शेतकरी बांधव माझ्या भेटीसाठी आले होते. त्यांच्या हातात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पिक होते तर डोळ्यात अश्रू. या शेतकरी बांधवाची भेट घेतली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. pic.twitter.com/lhCb25i3no
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 28, 2021
गेले तीन दिवस मराठवाड्यातील जिल्हयांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची बैठक सुरू असताना पावसाने नुकसान झालेली मोळी घेऊन डोळ्यात अश्रू दाटलेल्या या शेतकर्याने भेट घेतली. हातात नुकसानीची मोळी घेऊन आलेल्या त्या शेतकऱ्याचे म्हणणे जयंत पाटील यांनी ऐकून घेतले व त्यांना घाबरु नका सरकार तुमच्या सोबत आहे असा धीराचा शब्द दिला. केंद्र सरकारच्या कृपेने आधीच सोयाबीनचे भाव पडले आहेत आणि त्यात आता ही निसर्गाची अवकृपा झाली असून सर्वत्र पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत असेही पाटील यांनी स्पष्ट सांगितले.
दरम्यान बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री धनंजय मुंडे हे करत असल्याचेही पाटील यांनी त्या शेतकऱ्याला सांगितले.शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे शासनाचे कर्तव्य आहे आणि शासन आपले कर्तव्य पूर्ण करत आहे अशा शब्दात त्या शेतकऱ्याला जयंत पाटील यांनी दिलासा दिला.