मुंबई नगरी टीम
मुंबई । मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसूलीचे आरोप केलेले परमबीर सिंह यांच्या गायब होण्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.परमबीर सिंह यांना परदेशात पळून जाण्यात भाजपने मदत केली असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांच्याविरोधात तीन ठिकाणी वॉरंट बजावण्यात आले आहे. मात्र ते या तिनही ठिकाणी उपलब्ध नव्हते अशी माहिती पोलिसांनी चांदिवाल आयोगापुढे सादर केली. त्यामुळे आता परमबीर सध्या कुठे आहेत.यावर चर्चा सुरू असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांना परदेशात पळून जाण्यात भाजपने मदत केली असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.बाबत गृहविभागाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे शेवटचे लोकेशन गुजरातच्या अहमदाबादमध्ये होते. अहमदाबादमधूनच त्यांनी केंद्रातल्या भाजप नेत्यांना संपर्क साधला होता. आणि परमबीर सापडले तर अनेक गोष्टींचा खुलासा होईल असे पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांबाबत आज प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळात विचारविनिमय करण्यात आला.पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे उपस्थित होते. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांची यादी पाठवली. आजच्या बैठकीत या यादीतील नावांवर चर्चा झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवला असून तिथे उमेदवाराच्या नावाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा संयुक्त उमेदवार म्हणून काँग्रेसने निश्चित केलेला उमेदवार रिंगणात उतरणार आहे असेही पटोले यांनी सांगितले.