माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह एका बड्या अधिका-याचे निलंबन

मुंबई नगरी टीम

मुंबई । तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर शंभर कोटी वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे अखेर आज गृह विभागाकडून आज निलंबन करण्यात आले.खंडणी,ॲट्रोसिटीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.तर अपर पोलीस अधीक्षक,उत्पादन शुल्क नागपूर पराग मणेरे यांनाही निलंबित केले आहे.

परमबीर सिंग यांच्या निलंबना संदर्भातील फाईलवर मुख्यमंत्र्यांनी आज स्वाक्षरी केली.गृहविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देबाशिष चक्रवर्ती समितीच्या अहवालात परमबीर यांनी सेवेतील नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.याशिवाय एका खात्याचे प्रमुख असूनही ते वेळेत सेवेत रुजू झाले नाहीत, असा ठपकाही ठेवण्यात आला आहे.परमवीर सिंग यांना मध्यंतरी फरार म्हणून घोषित करण्यात आले होते तब्बल सात महिने त्यांचा ठावठिकाणा राज्य सरकारला लागलेला नव्हता. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते मुंबईत परतले होते.काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची तब्बल एका तासासाठी भेट झाली होती. यासंदर्भात बोलताना या भेटीची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.

परमबीर सिंग यांच्यावर राज्यात पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात मुंबईत मरिन ड्राइव्ह पोलिस स्टेशन, ठाणे जिल्ह्यात कल्याण, कोपरी आणि नगर पोलीस स्टेशनमध्ये खंडणी, ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत. कामात अनियमितता, कर्तव्यात कसूर आणि सेवा नियमांचे उल्लंघन असा ठपका चौकशी समितीने परमबीर सिंग यांचेवर ठेवला आहे.राज्याच्या गृहविभागाने परमबीर यांच्या सोबत अपर पोलीस अधीक्षक,उत्पादन शुल्क नागपूर पराग श्याम मणेरे यांनाही निलंबित केले आहे. मणेरी यांच्यावर ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद आहे. परमबीर सिंग हे ठाण्यामध्ये आयुक्त असताना मणेरे हे उपायुक्त होते.

Previous articleभाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नव्हे तर एकजुटीने लढली पाहिजे
Next articleमोठा निर्णय : ‘या’ विद्यार्थ्यांची दहावी आणि बारावीच्या परीक्षेची फी माफ