माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत ? माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. गेल्या ३० वर्षात माझ्यावर एकही आरोप झाला नाही, असा दावा करत माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग आज कुठे आहे ? असा सवाल माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी एका चित्रफितीव्दारे केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज फोर्ट परिसरातील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाले.त्यापूर्वी त्यांनी आपली भूमिका चित्रफीतीव्दारे मांडली.त्यात ते म्हणतात, परमबीर सिंग भारत सोडून पळून गेल्याच्या बातम्या आहेत. माझ्यावर आरोप करणारी व्यक्तीच पळून गेली आहे. परमबीर यांच्यावर पोलीस खात्यातील अनेकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. सचिन वाझे याने परमबीर सिंगच्या सांगण्यवारून माझ्यावर आरोप केले. मी गृहमंत्री असताना त्याला नोकरीतून काढण्याची प्रक्रिया सुरू केली, त्यामुळे त्याने माझ्यावर आरोप केले, असा दावाही देशमुख यांनी केला.परमबीर यांच्यासारख्या लोकांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप होत आहेत. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात असून याचे, मला दुःख आहे, अशी खंतही देशमुख यांनी व्यक्त केली आहे.मला ईडीने समन्स बजावल्यानंतर मी ईडीला तपासात सहकार्य करत नाही, अशा चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा मला ईडीचे समन्स आले, तेव्हा मी त्यांना कळवले की माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी ईडीच्या ऑफिसमध्ये येईन, असा खुलासा त्यांनी केला आहे.

Previous articleदेवेंद्र फडणवीस ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड : नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ
Next articleअन् पंकजाताई मुंडेंचा नाशकात अचानक सिटी बसमधून प्रवास..!