देवेंद्र फडणवीस ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड : नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

मुंबई नगरी टीम

मुंबई । अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.देवेंद्र फडणवीस हे ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असून जयदीप राणा आणि नीरज गुंडेसोबत त्यांचे काय संबंध होते असा सवाल उपस्थित करतानाच याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

गेले काही दिवस नवाब मलिक एनसीबी संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली आहे. आज मलिक यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर आरोप केले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू होता, असा दावा मलिक यांनी केला.फडणवीस हेच मुख्यमंत्री या नात्याने मुंबईतील ड्रग्ज रॅकेटला संरक्षण देत होते. केंद्र सरकारने एक चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा तपास करावा. लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी, यासाठी फडणवीस यांनी शासकीय यंत्रणेचा सर्रास वापर केला,” असा दावा मलिक यांनी केला.निरज गुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करतात. गुंडेच्या माध्यमातूनच फडणवीस यांचे मायाजाल चालायचे.फडणवीस सरकारच्या काळात नीरज गुंडे हे देवेंद्र यांचा दूत म्हणून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचे,असा दावाही मलिक यांनी केला.

फडणवीस यांचा वजीर याच शहरात राहतो.त्याचे नाव निरीज गुंडे आहे.फडणवीस सरकारच्या काळात त्याला मुख्यमंत्री निवास, मुख्यमंत्री कार्यालयात थेट प्रवेश होता. सर्व पोलिसांच्या बदल्या तो ठरवत होता. महाराष्ट्रात त्याच्याच माध्यमातून वसुली केली जायची,” असा आरोप मलिक यांनी केला.ड्रग्जचा खेळ मुंबई आणि गोव्यात सुरू राहावा म्हणून वानखेडे यांना मुंबईत आणण्यात आले. त्यामागे फडणवीस आहेत. महाराष्ट्रातील सर्व ड्रग्जचा खेळ फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालतो,” असा आरोप मलिक यांनी केला.फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी नदी पुनरुज्जीवनाचा संदेश देण्यासाठी गायलेल्या एका गाण्याला जयदीप राणा याने अर्थपुरवठा केला होता. हा राणा ड्रग विक्रेता (पेडलर) आहे, असा आरोप मालिक यांनी केला.ऐन दिवाळीत ड्रग्ज रॅकेट प्रकरणी राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोपांची मोठी राळ उडाली आहे.

Previous articleनवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का ? प्रविण दरेकर यांची टिका
Next articleमाझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत ? माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सवाल