मुंबई नगरी टीम
अहमदनगर । राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले.पूर्वी देशात ५ हजार किमीचे रस्त्यांचे काम झाले होते.मात्र नितीन गडकरींकडे जबाबदारी आल्यानंतर तोच आकडा १२ हजार किमीच्या पुढे गेला आहे,गडकरी हे त्यांच्याकडे येणाऱ्या राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा पक्ष बघत नाहीत तर त्याने आणलेले विकासकाम काय आहे बघतात अशा शब्दात त्यांनी गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले.
अहमदनगर जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झाले.या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.शरद पवार आणि नितीन गडकरी हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित येणार असल्याने हे दोन दिग्ग्ज नेते काय बोलणार याकडे लक्ष लागले होते.गडकरी यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी घेण्याच्या पूर्वी देशात ५ हजार किमीचे काम झाले होते, गडकरींकडे जबाबदारी आल्यानंतर तोच आकडा १२ हजार किमीच्या पुढे गेला आहे,म्हणजेच गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट झाल्याचे अशा शब्दात पवार यांनी गडकरींच्या कामाचे कौतुक केले.यावेळी पवार यांनी गडकरी यांच्या कामाच्या अनुभवाविषयी काही किस्से यावेळी सांगितले.देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणचे उत्तम रस्ते बघायला मिळतात. तेथिल खासदार, मंत्री, अधिकाऱ्यांकडे रस्त्यांचा विषय काढला की ते म्हणतात,ही गडकरी साहेबांची कृपा आहे.
गडकरी हे आपल्याकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा पक्ष न बघता विकासकाम बघतात, मी दिल्लीत बघतो की गडकरींकडे येणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा पक्ष ते बघत नाहीत तर त्याने आणलेले विकासकाम काय आहे हे ते पाहतात.त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतो, असेही पवार यावेळी म्हणाले.यावेळी पवार यांनी आपल्याला रस्त्याने प्रवास करायला आवडत असल्याचे सांगितले.अनेक राज्यांमध्ये मला कामानिमित्त जावे लागते. गाडीने प्रवास करायला मला आनंद मिळतो.त्यामुळे राज्यातील रस्ते बघायला मिळतात तसेच आजूबाजूच्या शेतातील पीक बघायला मिळते. म्हणून मी रस्त्यांनी करतो असेही पवार म्हणाले.