निमंत्रण पत्रिकेत नारायण राणेंचे तिसरे नाव ; व्यक्त केली नाराजी

मुंबई नगरी टीम

मुंबई । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्या लोकार्पण होणार असून,याचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.या कार्यक्रमाला केंद्रीय सुक्ष्म, लघु,मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे उपस्थित राहणार असले तरी निमंत्रण पत्रिकेवरून आता राजकारण सुरू झाले आहे.या यादीत राणे यांचे नाव तिस-या क्रमांकावर आणि बारीक अक्षरात असल्याने राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उद्या होणा-या चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय सुक्ष्म,लघु,मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.चिपी विमानतळ लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर पहिले नाव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तर दुस-या क्रमांकावर नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव आहे.तिस-या क्रमांकावर केंद्रीय सुक्ष्म, लघु,मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचे नाव बारीक अक्षरात आहे.त्यामुळे नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदेंपेक्षा राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्येही मीच वरिष्ठ असल्याचे राणे म्हणाले.निमंत्रण पत्रिकेत माझे नाव बारीक अक्षरात छापले आहे.त्याच्यावरील शाईही फाटली आहे.माझे नावही तिसऱ्या क्रमांकावर टाकण्यात आले आहे. मी राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्येही मी दोघांपेक्षा सीनियर आहे.मुख्यमंत्री म्हणून त्यांना पहिला मान दिला काही हरकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री कोण आहे हे महत्त्वाचे नाही.मात्र माझे नाव बारीक का झाले हे माहीत नाही. ही एक वृत्ती आहे, असा टोलाही राणे यांनी लगावला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाचे श्रेय संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीला आहे. १९९५ पासून मी या विमानतळाच्या उभारणीसाठी प्रयत्न करीत आहे. शिवसेना नेत्यांनी या विमानतळाचे श्रेय घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सिधुदुर्गमधील जनतेला वस्तुस्थिती ठाऊक असल्याचे राणे यांनी सागितले.राणे यांनी यावेळी या विमानतळाच्या उभारणीसाठी व एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा विस्ताराने आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, १९९० मध्ये मालवण – कणकवली मतदारसंघाचा आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल याचा अहवाल तयार करण्याचे काम ‘टाटा ‘ कंपनीमार्फत केले गेले. या कंपनीने दिलेल्या अहवालात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास पर्यटन क्षेत्राला चालना दिल्याखेरीज होणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा असा दर्जा मिळवून दिला.मुख्यमंत्री झाल्यानंतर विमानतळाच्या उभारणीला गती दिली.या विमानतळाच्या उभारणीचे श्रेय घेऊ पाहणारी शिवसेनेची नेते मंडळी या हालचालीत कुठेच नव्हती. शिवसेनेची राज्यात सत्ता असताना औद्योगिक विकास महामंडळाकडून या विमानतळाला पाणीही मिळू शकले नाही. विमानतळासाठी आवश्यक असलेला रस्त्यासाठीचा ३४ कोटींचा निधीही आघाडी सरकार देऊ शकले नाही. हीच मंडळी आज विमानतळाच्या श्रेयासाठी पत्रकबाजी करीत आहेत, असेही श्री. राणे यांनी नमूद केले. विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख न करून आघाडी सरकारने आपली संकुचित वृत्तीच दाखविली आहे ,असेही ते म्हणाले.

निमंत्रण पत्रिकेवर नाव नसलं तरी ……

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवर असो वा नसो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये, हृदयावर आजही त्यांचं नाव कोरलेलं आहे. राज्यात जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या ज्या निवडणूका झाल्या,त्यामध्ये विरोधी पक्षात असूनही सर्वाधिक मोठं यश हे भाजपला मिळालं. त्यामुळे निमंत्रण पत्रिकेवर नाव नसलं तरी जनतेच्या मनामध्ये फक्त देवेंद्र यांचंच नाव आहे. असा टोला यावेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्या शनिवार ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. परंतु या उदघाटनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश नाही आहे त्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, खरं म्हणजे मी कोकणातील आहे आणि अशाप्रकरच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्यांचा नावाचा समावेश असतो. परंतु दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांच नाव निमंत्रण पत्रिकेत नाही आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे चिपी विमानतळाच्या निर्मितीमध्ये मोठं योगदान असून त्यांचही नाव पत्रिकेत नाही. तसेच या कार्यक्रमाच्या निमंत्रणाचा निरोपही त्यांना देण्यात आलेला नाही. प्रत्येक ठिकाणी राजकीय अभिनिवेशनातून हे सरकार वागत आहे आणि प्रशासकीय यंत्रणेला वागवत आहे. हे पुनः एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आल्याची टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.

 

 

Previous article…अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार : शरद पवारांचा इशारा
Next articleदिल्लीच्या तक्तापुढे महाराष्ट्र कधीही झुकणार नाही : सुप्रिया सुळेंचा टोला