मुंबई नगरी टीम
बीड । नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील शेती पिकांचे तसेच शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले असून जीवित व वित्त हानी मोठया प्रमाणावर झाली आहे. अशा परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने दस-यापूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे. दरम्यान जिल्हयात बोकाळलेला ‘माफिया राज’ बंद करावा असेही त्यांनी म्हटले आहे.बीड जिल्हयातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सत्ताधा-यांचा याला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.
जिल्हयातील सर्वच तालुक्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. जिल्हयात ७ लाख ७२ हजार हेक्टर खरीप पेरणी क्षेत्रापैकी ५ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन, कापूस, उडीद, मुग, बाजरी आदी पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. गेवराई, माजलगांव, केज, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, परळी, धारूर आदी भागांत केवळ उभ्या पिकांचेच नाही तर शेत जमिनीची माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. जुन ते आजपर्यंत २२ जण पुराच्या पाण्याने मृत झाले असून ४६५ जनावरे दगावली आहेत. २० हजाराहून अधिक शेती पंप बंद पडली आहेत. माजलगांव धरणातून पाणी सोडल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली असून शेतात, घरात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २४ पाझर तलाव देखील फुटले आहेत. १४७ किलोमीटरचे रस्ते खराब झाले असून ६९ पुलांचे नुकसान झाले आहे.अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, त्यातच पीक विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आसमानी व सुलतानी असे दोन्ही संकट एकाचवेळेस आली आहेत. शासनाने अशा कठीण समयी त्यांच्या पाठिशी उभे रहावे आणि दस-यापूर्वी नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
माफिया राज बंद करा
जिल्हयात गेल्या कांही महिन्यांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.खून,दरोडे,मारामारी याबरोबरच महिलांवरील अत्याचार,जुगार, अवैध वाळू उपसा व वाहतूक आदींनी डोके वर काढले आहे.गुन्हेगार मोकाट सुटले असून त्यांना कायद्याचा अजिबात धाक राहिला नाही.सत्तेत बसलेल्या लोकांचाच याला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याने सर्व सामान्य जनता त्रासली आहे. हा ‘माफिया राज’ बंद करावा अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली आहे.