मुंबई नगरी टीम
परळी । जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्या नंतर सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे.संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दसरा मेळाव्याला लाखोंचा जनसागर उसळणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी घेत या मेळाव्यास यावे असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना करतानाच ‘मागील दोन वर्षाच्या काळात मनामध्ये बरच काही साचलं आहे,तुमच्या समोर मन मोकळ करायच आहे’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
भगवान भक्तीगडावर भक्ती आणि शक्तीची परंपरा जपण्यासाठी येणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांना आवाहन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की येणाऱ्या सर्वांनी सोबत आपल्या वाहनात भरपूर पाणी आणि शिदोरी सोबत ठेवावी. सावरगाव घाटच्या परिसरात दाखल झाल्यानंतर आपली वाहने योग्य ठिकाणी पार्क करून सकाळी ११ वा. सभेच्या ठिकाणी आसनस्थ व्हावे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा’ अशी विनंती त्यांनी केली.दरम्यान सावरगाव घाट येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या स्मारकासमोर दसरा मेळाव्याची ग्रामस्थांतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.यंदा होणाऱ्या मेळाव्यानिमित्त आवाहन करताना त्या म्हणाल्या ‘मागील दोन वर्षाच्या काळात मनामध्ये बरच काही साचलं आहे,तुमच्या समोर मन मोकळ करायच आहे’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हा दसरा मेळावा कोणत्याही जातीपातीचा, कोणत्याही वर्गाचा नाही. हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा मेळावा आहे. या मेळाव्याला येणारा कार्यकर्ता हा विचारांची ऊर्जा घेऊनच जातो, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. दरवर्षी दसरा मेळावा आगळावेगळा असतो. हा मेळावा लोकांच्या आदेशावरून आणि आग्रहावरून होत असतो. यावेळचे स्वरूप किती सुंदर आणि देखणे आहे हे केवळ तिथे येणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे. मला विश्वास आहे, मेळावा आगळावेगळा असेल, असे त्या म्हणाल्या.परंपरेप्रमाणे खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्यानिमित्त गोपीनाथ गड ते भगवान भक्तीगड अशी भव्य रॅली होणार आहे.गोपीनाथगड लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या दर्शनानंतर खा.प्रितम मुंडे सकाळी सहा वाजता रॅलीला सावरगाव घाटकडे मार्गस्थ होणार असूनसिरसाळा, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी, नायगाव मयूर मार्गे रोहतवाडी, चुंबळीहुन सावरगाव घाटला पोहोचणार आहे. मेळाव्यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.