मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्याच्या दसरा मेळाव्यात कुणाचा समाचार घेणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडीचा पुढील महिन्यात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असून,गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेना नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य केले जात आहे.या पार्श्वभूमीवर उद्या होणा-या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.या मेळाव्यात ते कुणाचा समाचार घेणार आहेत याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवाजी पार्क ऐवजी षण्मुखानंद सभागृहात होणा-या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्या शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवर महाविकास आघाडीकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ठाकरे हे विविध मुद्द्यांचा आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारचा दुजाभाव,ईडी,सीबीआय आदी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर,लखीमपूर प्रकरण,शेतकरी विषयक धोरणे,आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांना करण्यात येणारे लक्ष्य आदी विविध विषयांवर ते आपली मते मांडण्याची शक्यता आहे.सध्या विरोधी पक्षातील नेते मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह,शिवसेना नेत्यासह आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोप करीत आहेत.त्यामुळे भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील ते खास ठाकरी शैलीत प्रहार करण्याची दाट शक्यता आहे.कोरोनामुळे यंदा होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद सभागृहात होणार असल्याने काही मोजक्याच नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

आगामी काही महिन्यात मिनी विधानसभा ठरणा-या महानगरपालिकांसह,नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत.राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरविणा-या या निवडणूका असतील.शिवसेनेच्या द़ष्टीने महत्वाची असलेल्या मुंबई महापालिकेचीही निवडणूक होणार आहे.या निवडणुकांच्या प्रचाराचेही बिगुल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याच्या भाषणातूनच वाजवतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Previous articleदसरा मेळावा : मनामध्ये बरच काही साचलं आहे,तुमच्या समोर मन मोकळ करायच आहे !
Next article‘या’ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणार दर महिन्याला ३ हजार ५०० रूपये