मुंबई नगरी टीम
मुंबई । कोरोनाची दुसरी लाट संपल्यात जमा आहे. मात्र दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येईल, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. मात्र ती तीव्र नसेल असे सांगतानाच,देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पूर्ण होण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असून राज्यातील ९ कोटी ५० लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात ६ कोटी ४० लाख म्हणजे ७० टक्के जनतेचा पहिला डोस तर २ कोटी ९० लाख म्हणजे ३५ टक्के जनतेचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. दोन्ही डोस पूर्ण करण्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मॅाल आणि लोकल वगळता राज्यात कशावरही निर्बंध नाहीत.राज्य निर्बंधमुक्त झाले आहे.दुसरी लाट संपल्यात जमा आहे. मात्र दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येईल, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. मात्र ती तीव्र नसेल असेही टोपे यांनी स्पष्ट केले.नवी मुंबई महापालिकेने आपल्या क्षेत्रातील १०० टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केला असल्याचे टोपे यांनी सांगून नवी मुंबई महापालिकेचे अभिनंदन केले.राज्यातील ९.५ कोटी जनतेचे लसीकरण करण्यात आले आहे. दोन्ही डोसच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. एकुण लसीकरणातही पहिला क्रमांक आपण मिळविला असता पण उत्तरप्रदेशला जास्त प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आल्याने त्यांनी पहिल्या डोसमध्ये तो क्रमांक मिळविला आहे. केंद्र सरकारकडून आता योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात येत असल्याचे टोपे यांनी सांगितले.तरूण पिढी ही बाहेर फिरत असते.त्यामुळे त्यांच्या मार्फत संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे महाविद्यालयातील तरूणांचे लसीकरण विशेष मोहिम घेऊन करण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येईल. या माध्यमातून ४० लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे टोपे यांनी सांगितले.आता दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. निर्बंधही जवळपास शिथिलच झाले आहेत. लोक मोठया प्रमाणात आता बाहेर पडायला सुरूवात झाली आहे. अशा परिस्थितीत लसीकरण आणि कोविड प्रतिबंधक वर्तणूक या माध्यमातून तिसरी संभाव्य लाट आपल्याला रोखता येऊ शकते. सध्या कोविडचा नवीन व्हेरिअंट तयार झालेला नाही, ही समाधानाची बाब असल्याचेही टोपे म्हणाले.